स्त्री - पुरुष गुणोत्तरात असमतोल; पुण्यात १ हजार मुलांमागे केवळ ९२९ मुलींचा जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 12:46 PM2024-05-03T12:46:22+5:302024-05-03T12:47:07+5:30
आपल्याला स्त्री - पुरुष गुणोत्तरात समतोल राखायचा असेल तर गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती द्या, पुणे महापालिकेचे आवाहन
पुणे: स्त्री - पुरुष गुणोत्तरात आपल्याला समतोल राखायचा असेल तर गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती द्या, असे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. मार्च, २०२४पर्यंत शहरात एक हजार मुलांमागे केवळ ९२९ मुलींचा जन्म झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या नोंदीतून दिसून आले आहे.
पुणे महापालिका हद्दीत आजमितीला ७५३ केंद्र ही गर्भधारण पूर्व व प्रसवपूर्ण निदान तंत्र (पीसीबीएनडीटी) कायद्यांतर्गत कार्यरत आहेत. याठिकाणी सोनोग्राफी मशीन, सिटी स्कॅन मशीन व एमआरआय मशीन या आधुनिक यंत्रणेद्वारे निदान करण्याची यंत्रणा आहे. या सर्व केंद्रांची तपासणी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दर ३ महिन्याला केली जात असल्याची माहिती उपआरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली.
या तपासणीकरिता क्षेत्रीय कार्यालयातील १५ क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा व वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. या सर्वांकडून कामे करून घेण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागात स्वतंत्र पीसीबीएनडीटी कक्ष तयार करण्यात आला आहे. तरीही स्त्री - पुरुष गुणोत्तर पाहता या पीसीबीएनडीटी कायद्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.
स्त्रीभ्रूण हत्या हा सामाजिक प्रश्न असल्याने नागरिकांनीही या हत्या रोखण्यासाठी मदत करावी. जेथे असे प्रकार होत असतील, अशा केंद्रांची त्यांनी माहिती द्यावी, संबंधित नागरिकाचे नाव गुप्त ठेवण्यात येईल. यासाठी १८००२३३४४७५ या क्रमांकावर संपर्क साधावा. - डॉ. कल्पना बळीवंत, उपआरोग्य अधिकारी पुणे महापालिका