जनतेच्या तक्रारींचे तत्काळ करा निवारण
By admin | Published: April 21, 2017 06:05 AM2017-04-21T06:05:52+5:302017-04-21T06:05:52+5:30
महावितरण आणि महापारेषणमध्ये धोरणात्मक सुधारणा करण्याची आवश्यकता असून, जनतेला अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवावे लागू नयेत तसेच जनतेच्या कायदेशीर तक्रारी तत्काळ
पुणे : महावितरण आणि महापारेषणमध्ये धोरणात्मक सुधारणा करण्याची आवश्यकता असून, जनतेला अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवावे लागू नयेत तसेच जनतेच्या कायदेशीर तक्रारी तत्काळ सोडवाव्यात अशा सक्त सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिल्या.
बावनकुळे यांनी रास्ता पेठेतील महावितरणच्या कार्यालयामध्ये त्यांनी नागरिक, ग्राहक आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांशी संवाद साधत तक्रारी समजून घेतल्या. या वेळी प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे, महापारेषणचे संचालक (संचालन) ओमप्रकाश एम्पाल, पुणे परिमंडलचे मुख्य अभियंता रामराव मुंडे, बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर
तसेच पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता आर.एन. म्हस्के आदी उपस्थित होते. जर अधिकाऱ्यांनी तक्रारींची दखल घेतली नाही तर थेट मला मेसेज पाठवा असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी नागरिकांनी वीजबिल वेळेवर न येणे, अवाजवी बिल मिळणे, वीजपुरवठा खंडित होणे, वेळेवर वीजजोडणी न मिळणे, पायाभूत सुविधा आराखड्यातील कामांचा दर्जा, वीजचोरी, ऊस जळिताची नुकसानभरपाई आदी तक्रारी मांडल्या. या सर्व तक्रारींचे निवारण लवकरात लवकर करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महावितरण-महापारेषणच्या प्रशासनास दिले.
सहा महिन्यांनी येथे पुन्हा संवाद कार्यक्रम घेणार आहे. त्या वेळी ग्राहकांच्या या तक्रारींचे निराकरण झालेले दिसले पाहिजे, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयांमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक असून, कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात दौरे करून पायाभूत सुविधा आराखड्यातील कामे नियमित करून घेण्याच्या सूचनाही दिल्या.
पुणे दौऱ्यावर आलेल्या बावनकुळे यांनी महावितरणच्या बोपोडी येथील माऊंट वर्ट व कोथरूडमधील राठी बेहरे उपकेंद्राचे भूमिपूजन आणि बालेवाडीमधील कन्फर्ट झोन उपकेंद्राचे उद्घाटन केले.
कार्यक्रमाला आमदार विजय काळे, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुनीता वाडेकर, दिलीप वेडे पाटील, आदित्य माळवे, श्रद्धा प्रभुणे, अल्पना वरपे, अर्चना मुसळे आदी उपस्थित होते. तर संध्याकाळी त्यांनी विधानभवनामध्ये लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन आढावा घेतला.
या बैठकीला खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, बाबूराव पाचर्णे, मेधा कुलकर्णी, राहुल कुल, शरद सोनवणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, विविध नगरपालिकांचे नगराध्यक्ष, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
(प्रतिनिधी)