चोरट्यांना घाबरुन धूम ठोकणाऱ्या 'त्या' दोन पोलिसांचे तातडीने निलंबन; औंध येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 12:01 PM2020-12-30T12:01:01+5:302020-12-30T12:02:34+5:30

चोरट्यांना पाहून पोलीस पळून गेल्याची मंगळवारी दिवसभर शहरात चर्चा होती.

Immediate suspension of 'those' two policemen who frightened thieves; Incident at Aundh | चोरट्यांना घाबरुन धूम ठोकणाऱ्या 'त्या' दोन पोलिसांचे तातडीने निलंबन; औंध येथील घटना

चोरट्यांना घाबरुन धूम ठोकणाऱ्या 'त्या' दोन पोलिसांचे तातडीने निलंबन; औंध येथील घटना

googlenewsNext
ठळक मुद्देशहर पोलीस दलाची बदनामी झाल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले मत

पुणे : औंध येथील शैलेश टॉवर येथे चोरटे शिरले असताना त्यांना पाहून घाबरुन पळणारे पोलीस हवालदार प्रविण रमेश गोरे आणि स्वत: जवळ रायफल असतानाही चोरट्यांना कोणताही प्रतिकार न करता चोरट्यांना पळून जाऊ देणारे पोलीस नाईक अनिल दत्तु अवघडे यांना पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी निलंबित केले आहे. चोरट्यांना पाहून पोलीस पळून गेल्याची मंगळवारी दिवसभर शहरात चर्चा होती. यामुळे शहर पोलीस दलाची बदनामी झाल्याचे मत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यामुळे या दोघा पोलीस कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे.

औंध येथील शैलेश टॉवरमध्ये सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. हवालदार प्रविण गोरे आणि पोलीस  नाईक अनिल अवघडे हे औंध येथे मार्शल म्हणून कर्तव्यास होते. शैलेश टॉवर येथे सुरक्षारक्षकाला मारहाण करीत असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. पोलीस नियंत्रण कक्षाने ही माहिती या दोघा बीट मार्शल यांना दिली. त्यानुसार हे मार्शल सव्वातीन वाजता त्या ठिकाणी पोहचले. त्यावेळी एसएलआर रायफल असणारे अवघडे मोटारसायकलवरुन खाली उतरले. त्याचवेळी शैलेश टॉवरच्या आवारातून ४ शस्त्रधारी चाकू, कटावणी व गज घेऊन या मार्शलच्या समोरुन जाऊ लागले. ते पाहून मोटारसायकलवरील गोरे यांनी आपले सहकारी अवघडे यांना तेथेच सोडून मोटारसायकल वळवून पळून गेले. चोरट्यांपैकी एकाने अवघडे यांना मारण्याकरीता त्यांच्या हातातील कटावणी उगारली व दुसऱ्याने गाडी निकालो और इनको ठोक दो असे म्हणाला. इतर चोरट्यांच्या हातात चोरीचे सामान होते. अवघडे यांच्याकडे एसएलआर रायफल असून देखील त्यांनी या चोरट्यांना अटकाव करण्याचा, पकडण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच चोरटे पळून गेल्यानंतरही त्यांचा पाठलाग केला नाही.

या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला आपल्या वॉकी टॉकी अथवा मोबाईलवरुन माहिती दिली नाही. त्यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील रात्रगस्तीवरील अधिकारी व कर्मचारी यांना माहिती न मिळाल्याने चोरटे सुरक्षारक्षकाला मारहाण करुन पोलिसासमक्ष पळून जाण्यास यशस्वी झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कैद झाला होता. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याने पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दोघांना निलंबित केले आहे.

Web Title: Immediate suspension of 'those' two policemen who frightened thieves; Incident at Aundh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.