शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील पुनर्वसनाचे शिक्के तत्काळ रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:15 AM2021-08-20T04:15:32+5:302021-08-20T04:15:32+5:30
शेलपिंपळगाव : शासनाने भामा-आसखेड व चासकमान धरण प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर टाकलेले पुनर्वसनाचे शिक्के तत्काळ रद्द करण्याची प्रक्रिया राबवावी; अन्यथा ...
शेलपिंपळगाव : शासनाने भामा-आसखेड व चासकमान धरण प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर टाकलेले पुनर्वसनाचे शिक्के तत्काळ रद्द करण्याची प्रक्रिया राबवावी; अन्यथा महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन करण्याचा गर्भित इशारा महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला.
कोयाळी-भानोबाची (ता. खेड) येथे खेड तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शिवाजी नांदखिले, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वस्ताज दौंडकर, तालुकाध्यक्ष सुभाष पवळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, तालुका युवा अध्यक्ष सुनील पोटवडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब तात्याबा कोळेकर, समाधान भाडळे, आप्पासाहेब दिघे, कैलास बवले, रामदास बवले, माऊली ढोमे, माजी उपसरपंच एकनाथ आवटे, माजी सरपंच बाळासाहेब येधुजी कोळेकर, माजी उपसरपंच विकास भिवरे, बापूसाहेब सरवदे, सरपंच गणेश कोळेकर, विशेष कार्यकारी अधिकारी भूदेव शिंदे, माजी सरपंच गणेश पवळे, बाळासाहेब खैरे, के. एन. घेनंद, लक्ष्मण शिंदे, उपसरपंच उज्ज्वला घेनंद, सुवर्णा पठारे उपस्थित होते.
रघुनाथदादा पाटील म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून पुनर्वसनाचे घोंगडे भिजत आहे. मात्र, माझ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर टाकलेल्या पुनर्वसनच्या शिक्क्यांमुळे भावा-भावांमधील जमिनींची खातेफोड रखडली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शासनाने येत्या पंधरा दिवसांत उसाची एफआरपी जाहीर करावी. तसेच शेतकऱ्यांच्या पिकाला व दुधाला हमीभाव जाहीर करावा. शासन जर शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत असेल तर आम्हाला आमच्या हक्कांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे त्यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, वडगाव - घेनंद व कोयाळी - भानोबाची येथे शेतकरी संघटनेच्या शाखांचे उद्घाटन रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक सुभाष पवळे यांनी केले. सूत्रसंचालन आप्पा दिघे यांनी केले.
रेल्वेचा प्रवास सुखकर व सर्वांना परवडेल असा असल्याने रेल्वे प्रकल्प होणे गरजेचे आहे. त्यामुळे रेल्वे प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध करू नका. मात्र, रिंग रोडमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन बाधित होत असल्याने रिंग रोडला विरोध होणे स्वाभाविक आहे. शेतकऱ्यांनी शेतीपंपांची वीज बिले भरू नका.
- रघुनाथदादा पाटील, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना.
१९ शेलपिंपळगाव
शेतकरी मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना रघुनाथदादा पाटील.