स्वाइन फ्ल्यूबाबत आवश्यक उपाययोजना तातडीने करा
By Admin | Published: March 28, 2017 02:30 AM2017-03-28T02:30:34+5:302017-03-28T02:30:34+5:30
स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना पिंपरी-चिंचवड महापालिकेने कराव्यात.
पिंपरी : स्वाइन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना पिंपरी-चिंचवड महापालिकेने कराव्यात. नागरिकांच्या प्रबोधनासाठीही व्यापक प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सांवत यांनी सांगितले.
सोमवारी दुपारी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे आरोग्य मंत्र्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. अतिदक्षता विभागातील रुग्णांची पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते.
अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी स्वागत केले. राज्याचे आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, आरोग्य विभागाचे सह संचालक डॉ. एम. एस. डिग्गीकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. नितीन बेल्दीकर, उपसंचालक डॉ. एच. व्ही. चव्हाण, साथरोग अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, अतिरिक्त संचालक डॉ. पी. जी. दर्शने, वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख आदी उपस्थित होते.
स्वाइन फ्लू नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांना शहरातील स्वाइन फ्लूच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. या वेळी आरोग्य मंत्र्यांनी शहरामध्ये स्वाइन फ्लू नियंत्रणात आणण्याकरिता विविध उपाययोजना करण्याबाबत सूचना देताना शहरातील स्वाइन फ्लूबाबतचा आढावा घेतला. शहरातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या स्वाब तपासणीकरिता पॅथॉलॉजी लॅबमार्फत तपासणीसाठी २,५००/- रुपये शुल्क आकारणी करण्याच्या सूचना शहरातील पॅथॉलॉजींना द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लू लसीची कमतरता
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात स्वाइन फ्लू रुग्णांची संख्या वाढत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दुसरीकडे महापालिका रुग्णालयात उपलब्ध असलेली स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस संपत आली आहे. लशीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप लस उपलब्ध झालेली नाही.
शहरात १ जानेवारीपासून अद्यापपर्यंत स्वाइन फ्लूने सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारीदेखील ४ हजार ३६२ रुग्णांची तपासणी करण्यात आली; तर ३९ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या. यासह दोन जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस संपत आली असल्याने रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. तीन-चार दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे. मागणी करूनही अद्याप लस उपलब्ध झालेली नसून, महापालिकेचा वैद्यकीय विभाग स्वाइन फ्लू लशीच्या प्रतीक्षेत आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्र्यांनी वायसीएमला भेट देत स्वाइन फ्लूचा आढावा घेतला. महापालिकेकडे उपलब्ध असलेली स्वाइन फ्लू प्रतिबंधात्मक लस संपत आली आहे. लवकरात लवकर नवीन लस उपलब्ध व्हावी अन्यथा मोठी गैरसोय होईल, असे वैद्यकीय अधिकारी म्हणाले.
शहरामध्ये स्वाइन फ्लूमुळे अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भिती आहे. या रोगावर लस उपलब्ध करावी.