कचरा आढळल्यास तत्काळ कळवा, शिरूर नगर परिषदेचा उपक्रम, स्वच्छता अभियानाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 12:39 AM2017-09-20T00:39:03+5:302017-09-20T00:42:40+5:30
शिरूर : कचरा आढळल्यास नगर परिषदेस कळवा. अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमेमुळे शहरात स्वच्छता अभियानाला गती मिळाली आहे. शहरातील विविध भागांतून येणा-या कचरा समस्येचे तत्काळ निवारण केले जात असून, स्वच्छता अभियानाच्या पूर्ण यशासाठी सोशल मीडियावर नगर परिषदेनेच प्रतिष्ठित नागरिक नगर परिषद कर्मचारी व नगरसेवकांचा ग्रुप तयार केला आहे.
शिरूर : कचरा आढळल्यास नगर परिषदेस कळवा. अशा प्रकारच्या स्वच्छता मोहिमेमुळे शहरात स्वच्छता अभियानाला गती मिळाली आहे. शहरातील विविध भागांतून येणा-या कचरा समस्येचे तत्काळ निवारण केले जात असून, स्वच्छता अभियानाच्या पूर्ण यशासाठी सोशल मीडियावर नगर परिषदेनेच प्रतिष्ठित नागरिक नगर परिषद कर्मचारी व नगरसेवकांचा ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपवर कच-याचे फोटो टाकले जात असून, त्याचा निपटारा केल्याचे फोटोही कर्मचारी टाकताना दिसत आहेत.
‘स्वच्छता हीच सेवा’ या संकल्पनेंतर्गत १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत राज्यात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. शिरूर नगर परिषदेने यात पूर्ण पारदर्शकता ठेवत शहरातील सत्ताधारी, विरोधक, प्रतिष्ठित नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिक यांना या मोहिमेत सामावून घेतले. सोशल मीडियावर (व्हॉट्स अॅप) या सर्व घटकांचा एक ग्रुप तयार केला. यात सभागृहनेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, स्वच्छता सभापती सचिन धारिवाल व मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी शहरात कुठे कचरा आढळल्यास तत्काळ त्याचा फोटो गु्रपवर टाकण्याचे आवाहन केले. याव्यतिरिक्त आरोग्य निरीक्षक डी. टी. बर्गे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता पथक तयार करून शहरातील सर्व भाग स्वच्छतेसाठी पिंजून काढण्याच्या सूचना करण्यात आल्या. याचा प्रचंड सकारात्मक परिणाम जाणवला. ग्रुपवर शहरातील काही भागांतील कचरा असलेले फोटो टाकण्यात आले. त्याचा त्वरित निपटारा करण्यात येऊन कर्मचा-यांनीच तो कचरा उचलल्याचे, परिसर स्वच्छ केल्याचे फोटोही टाकले. गेली चार दिवसांपासून अशा प्रकारे अभियानाला गती प्राप्त झाली असून, अशा पद्धतीने नगर परिषद व नागरिकांमध्ये समन्वय राहिल्यास शहर कचरामुक्त होण्यास वेळ लागणार नाही असे दिसते.
>तत्काळ दखल : कच-याचे वर्गीकरण
ग्रुपमुळे शहरातील कानाकोप-यात असणा-या कच-याची माहिती उपलब्ध होत असून, त्याच्यावर तत्काळ कार्यवाही होतानाचे चित्र आहे. वास्तविक शहरात स्वच्छतेच्या कायमस्वरूपी नियोजनासाठी घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. कचरा उचलण्यासाठी नागरिकांना दोन डस्टबिन मोफत वाटप करण्यात आले आहे. या डस्टबिनमध्ये एकात ओला व दुसºयात सुका कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात आले. घंटागाड्यांतही ओला व सुका कचºयासाठी स्वतंत्र जागा करण्यात आली आहे. मात्र, काही नागरिक घंटागाड्यांची वाट न पाहता दिसेल तिथे कचरा टाकताना दिसतात. अनेक नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करत नाहीत. नगर परिषदेने जर नागरिकांना सामावून घेऊन स्वच्छता अभियानाला गती दिली असेल तर नागरिकांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे आहे.