घरच्या घरीच करा बाप्पाचे विसर्जन : महापौर मोहोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:15 AM2021-09-10T04:15:04+5:302021-09-10T04:15:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : घराच्या घरी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याकरिता पुणे महापालिकेने एकूण २०० मे. टन अमोनियम बायकार्बोनेट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : घराच्या घरी श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याकरिता पुणे महापालिकेने एकूण २०० मे. टन अमोनियम बायकार्बोनेट सर्व क्षेत्रीय कार्यालयांव्दारे, प्रत्येक आरोग्य कोठ्यांच्या ठिकाणी आणि गणेश मंडळाच्या ठिकाणी नागरिकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे़ तसेच शहरात २४७ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र उभारल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली़ दरम्यान, कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेता घरच्या घरीच बाप्पाचे विसर्जन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे़
गणेश विसर्जनासंदर्भात माहिती देताना मोहोळ म्हणाले, प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमधील नागरिकांना सरासरी १२-१३ टन अमोनियम बायकार्बोनेट वितरित केले आहे. तसेच ज्या नागरिकांना घरच्या घरी मूर्ती विसर्जन करणे शक्य नाही, अशा नागरिकांसाठी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत दीडशेपेक्षा जास्त मूर्ती विसर्जन रथ अर्थात फिरत्या हौदांची सोय उपलब्ध करून दिली आहे.
गेल्या वर्षी गणेशोत्सव काळात पुणे महापालिका स्वच्छ सहकारी संस्थेमार्फत एकूण ८७ हजार ४४२ किलो निर्माल्य गोळा केले होते. यावर्षी देखील सर्व गणेशमूर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली आहे. याचबरोबर निर्माल्याचे वेगळे संकलन करून ठेवणाऱ्या नागरिकांच्या घरी जाऊन, सर्व निर्माल्य कचरा वेचकांमार्फत अथवा घंटागाडीमार्फत ओला सुका कचरा व्यतिरिक्त वेगवेगळ्या पोत्यांमधून दि. १२, १५ आणि २० सप्टेंबर २०२१ रोजी घेतले जाणार आहे़ कोणीही निर्माल्य नदीपात्र, तलावात टाकू नये, असे आवाहन मोहोळ यांनी केले.
-----------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीही शहरात महापालिकेच्या आवाहनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता़ गतवर्षी फिरत्या हौदांमध्ये ८२ हजार ५५१ मूर्ती विसर्जन आणि संकलन केंद्रावर ७९ हजार ७७७ मूर्ती संकलन असे एकूण १ लाख ६२ हजार ३२८ गणेश विसर्जन झाले होते.
---------------------