भाविकांच्या लाडक्या गणरायांचे जयघोषात विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:12 AM2021-09-21T04:12:06+5:302021-09-21T04:12:06+5:30
पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’चा जयघोष, मंत्रोच्चाराचे मंगलमय सूर, फुलांच्या पायघड्या आणि गुलाबपुष्पाचा वर्षाव अशा ...
पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’चा जयघोष, मंत्रोच्चाराचे मंगलमय सूर, फुलांच्या पायघड्या आणि गुलाबपुष्पाचा वर्षाव अशा भावपूर्ण वातावरणात अखिल मंडई मंडळाच्या गणरायाला अनंत चतुर्दशीला निरोप देण्यात आला. आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजलेल्या ‘गज गवाक्ष अमृत कुंडात’ गणरायाला निरोप देण्यात आला. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते रविवारी (दि. १९) सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी गणरायाचे विसर्जन झाले.
अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, उपाध्यक्ष मिलिंद काची, कार्याध्यक्ष अभय थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट, सुरज थोरात, विक्रम खन्ना, संकेत मते, अजय झवेरी, संकेत तापकीर आदी यावेळी उपस्थित होते. अण्णा थोरात म्हणाले, सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने मंदिरातच उत्सव साजरा करण्यात आला. पुणेकरांनी मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गर्दी न करता उत्सव यशस्वी करण्यास सहकार्य केले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे कार्यकर्त्यांच्या जल्लोषात दुपारी अडीच वाजता मांडवाजवळील कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. श्रींच्या मूर्तीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यावर मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप देण्यात आला. ‘दगडूशेठ’च्या श्रींचे मंदिरातच विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. विविधरंगी फुलांनी सजविलेल्या गणेश कुंडात रविवारी (दि. १९) अनंत चतुर्दशीला तिन्ही सांजेला सायंकाळी ६ वाजून ३६ मिनिटांनी विसर्जन झाले. यावेळी न्यासाचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.