घरगुती गणपतीचे घरीच विसर्जन करणे, शास्त्राला अनुसरुनच : वेदमूर्ती डॉ.माधव केळकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 09:31 PM2020-08-18T21:31:59+5:302020-08-18T21:33:05+5:30

कोरोना संसर्ग ही आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याची एक संधी आहे.

Immersion of Ganpati at home; According to the scriptures: Vedmurti Dr. Madhav Kelkar | घरगुती गणपतीचे घरीच विसर्जन करणे, शास्त्राला अनुसरुनच : वेदमूर्ती डॉ.माधव केळकर

घरगुती गणपतीचे घरीच विसर्जन करणे, शास्त्राला अनुसरुनच : वेदमूर्ती डॉ.माधव केळकर

Next
ठळक मुद्देपुण्यात ३३०० सार्वजनिक गणेश मंडळे असून त्यापैकी अनेक मंडळे एकत्र उत्सव साजरा करणार

पुणे : विरघळणाऱ्या मातीची गणेश मूर्तीची यंदा प्रतिष्ठापना करावी व
त्यानंतर घरच्या गणपतीचे घरीच विसर्जन करावे, हे शास्त्राला धरुन आहे. कोणत्याही पाणवठ्याच्या ठिकाणी विसर्जन करता येते, जसे काही गावात नदी, काही गावात समुद्रात, काही गावात विहिरीत तर काही गावात तळ्यात विसर्जन करण्याची प्रथा आहे. त्यामुळे घराच्या गणपतीचे विसर्जन घरीच करणे शास्त्राला धरुनच असल्याचे प्रतिपादन वेदमूर्ती डॉ.माधव केळकर यांनी केले.

याबाबत केळकर यांच्यासह वेदमूर्ती प्रकाश दंडगे, वेदमूर्ती पंकज केळकर, वेदमूर्ती मंदार खळदकर यांनी एक निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव व घरातील गणपती उत्सवाविषयी शहर पोलिसांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत डॉ. केळकर यांनी ही माहिती दिली. डॉ.केळकर यांनी महाराष्ट्रभर फिरुन तेथील गणेशोत्सवाच्या प्रथा, परंपरा यांचा अभ्यास केला आहे. याविषयी डॉ. केळकर यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी अजूनही घरच्या साच्यामध्येच गणेश मूर्ती तयार केली जाते. त्यासाठी लाल, काळी माती वापरली जाते. ही पाण्यात सहज विरघळते. अनेक ठिकाणी तुळशी, वड, उंबर अशा देववृक्षाखालील माती घेऊन गणेश मूर्ती साकारतात व तेथेच तिचे विसर्जन केले जाते. वाहत्या पाण्यातच विसर्जन केले पाहिजे अन्यथा देवतत्त्वे सर्वदूर पोहचत नाहीत, असा प्रतिवाद केला जाईल. पण अनेक गावात वाड्या वस्त्यांमध्ये विविध परंपरा दिसतात. आजही त्या चालू आहेत.
अनेक घरात आणि सार्वजनिक गणेशोत्सवात गणेश याग, सहस्त्रावर्तने,मंत्रजागर असे अन्य धार्मिक कार्यक्रम केले जातात. पण हे कार्यक्रम अनिवार्य नाहीत. हौसेचे आणि अंगभूत कार्यक्रम आहेत. त्यामुळे एखाद्या वर्षी झाले नाहीतर कोणतीही धार्मिक बाधा येत नाही. त्यामुळेच यावर्षी आम्ही पुरोहितांनी सहस्त्रावर्तनाचा गट तयार केला नाही, असे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी पुणेकरांनी ७० हजार गणेशमूर्ती दान केल्या होत्या, असे
सांगून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, यंदा घराच्या गणेश मूर्तीचे घरीच विसर्जन करण्याचे पुणेकरांना आवाहन केले आहे. त्याला सर्वजण प्रतिसाद देताना दिसत आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात मूर्ती दानासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.

पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सांगितले की, कोरोना संसर्ग ही आदर्श गणेशोत्सव साजरा करण्याची एक संधी आहे. फिरत्या हौदात गणेश विसर्जनाची सोय करणार असल्याची महापालिकेच्या घोषणेविषयी अनेक शहरातून स्वागत केले जात असून या योजनेविषयी विचारणा केली जात आहे. पोलिंग बुथप्रमाणे शहरातील सर्व ठिकाणी मूर्तीदानासाठी संकलनाची सोय करावी, अशा सूचना येत आहे. सर्व मंडळांनी दर्शनाची व्यवस्था आॅनलाईन उपलब्ध करुन द्यावी, असे सांगण्यात आले आहे.

४ लाख ७३ हजार घरचा गणपतीचे विसर्जन हा एक मोठा प्रश्न आहे. एका घरातून विसर्जनासाठी ४ जण बाहेर पडले तरी एकाच दिवशी २० लाख लोक बाहेर येतात. त्यामुळे लोकांनी घरी, सोसायटीत आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले.

पुण्यात ३३०० सार्वजनिक गणेश मंडळे असून त्यापैकी अनेक मंडळे एकत्र येऊन उत्सव मंदिरातच साजरा करीत आहेत. केवळ ३० ते ३५ टक्के मंडळांनाच छोटा मंडप टाकण्याची परवानगी द्यावी लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Immersion of Ganpati at home; According to the scriptures: Vedmurti Dr. Madhav Kelkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.