पुण्यातील मानाच्या ‘श्रीं’’च्या मूर्तीचे विसर्जन उत्सव मंडप व मंदिरातच होणार; कौतुकास्पद निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 06:44 PM2020-08-27T18:44:08+5:302020-08-27T18:48:56+5:30
यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाचे व प्रमुख गणपती मंडळांचा निर्णय
पुणे : दरवर्षी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जल्लोषात लाडल्या गणरायला ढोलताशांच्या गजरात निरोप दिला जातो. परंतु यंदा बेलबाग चौक, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष पुणेकरांना अनुभवायला मिळणार नाही. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या आणि प्रतिष्ठित गणेश मंडळांनी ‘श्रीं’चे विसर्जन उत्सव मंडप व मंदिरातच स्वच्छ पाण्याच्या हौदात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव मानाच्या आणि प्रमुख मंडळांनी साधेपणाने करण्यावर भर दिला आहे. त्याच धर्तीवर देश विदेशातील भक्तांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेला ’श्रीं’’चा विसर्जन सोहळा देखील मिरवणूक न काढता संपन्न होणार आहे, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्यामुळे गणेश भक्तांनी विसर्जनाच्या दिवशी घराबाहेर न पडता मानाच्या व प्रमुख मंडळाच्या ' श्रीं ' चा विसर्जन सोहळा ऑनलाइन अनुभवावा असे आवाहन देखील मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. यावेळी श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, केसरी वाडा गणपतीचे अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे संजयमते, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, पुनीतबालन यांसह नितीन पंडित, पृथ्वीराज परदेशी आदी उपस्थित होते.
---------------------------------------------------------
असा होईल विसर्जन सोहळा
परंपरेप्रमाणे पुण्याचे महापौर सकाळी १०.३० वाजता श्री कसबा गणपतीला हार घातला जाईल व त्यानंतर सकाळी ११.३० वाजता कसबा गणपती चे विसर्जन होईल.त्याचप्रमाणे श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी १२.१५ वाजता,श्री गुरुजी तालीमचा गणपती दुपारी १ वाजता, श्री तुळशीबाग गणपती दुपारी१.४५ वाजता, केसरी वाडा गणपती दुपारी २.३० वाजता, श्रीमंत भाऊ भाऊसाहेबरंगारी गणपतीचे दुपारी ३.१५ वाजता, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सूर्यास्ताच्या वेळी, अखिल मंडई मंडळाचा गणपती सायंकाळी ७ वाजता विसर्जन होईल.
-----------------------------------------------------------
लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दीनिमित्त सोमवारी (31 ऑगस्ट)विसर्जन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी एकत्रपणे केसरीवाडयात आरती करुन लोकमान्यांना मानवंदना देणार असल्याचे केसरी गणेशोत्सवाचे सचिव अनिल सकपाळ यांनी सांगितले.
-----------------------------------------------------------
आम्ही शासन व महापालिका प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी कोरोना काळातही गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याची परवानगी दिली. येत्या1 सप्टेंबर रोजी विसर्जन सोहळा पार पडणार आहे. मात्र त्यावेळी देखील मिरवणूक न काढता उत्सव मंडप किंवा मंदिरातच स्वच्छ पाण्याच्या हौदातमानाच्या ‘श्रींं’’च्या मूर्तीचे विसर्जन होणार आहे. याकरिता प्रशासनाची मदत घेतली जाणार नसून, सर्व मंडळं स्वत:च हौदाची व्यवस्था करणार आहेत.2014 मध्ये विसर्जन सोहळ्यात 32 हजार मूर्ती हौदामध्ये विसर्जित झाल्या होत्या. 2015 साली दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा स्वच्छ पाण्याच्या हौदात श्रींचे विसर्जन करण्याची परंपरा सुरू केली. त्यानंतर त्यावर्षी 2 लाख 92 हजार मूर्तींचे हौदात विसर्जन झाले. आम्हीपुणेकरांना नम्र आवाहन करू इच्छितो की मूर्ती घरीच विसर्जित करा आणि गर्दी टाळा.
- श्रीकांत शेटे, अध्यक्ष श्री कसबा गणपती
---------------------------------------------------------
यंदाही परंपरेप्रमाणेच विसर्जन सोहळ्याला प्रारंभ होईल. दरवर्षी विसर्जनाच्या दुस-या दिवशी पहाटे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींचे विसर्जन होते. मात्र यंदा विसर्जनाच्याच दिवशी दुपारी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे
-पुनीत बालन, उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट