Pune: मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे हौदात विसर्जन; दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरीला देखील निरोप
By श्रीकिशन काळे | Updated: September 28, 2023 17:32 IST2023-09-28T17:29:39+5:302023-09-28T17:32:40+5:30
दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन हौदात झाले....

Pune: मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे हौदात विसर्जन; दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरीला देखील निरोप
पुणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, बाप्पा निघाले गावाला चैन पडेना आम्हाला. अशा जयघोषात शहरातील मानाच्या गणरायांचे विसर्जन हौदात करण्यात आले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पहिल्या मानाच्या कसबा गणरायाचे विसर्जन झाले. त्यानंतर दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन हौदात झाले.
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती विसर्जनासाठी मंडपातून सकाळी ९.३० वाजता निघाला होता. त्यानंतर मंडई येथील टिळक पुतळ्यासमोर आरती करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते आरती झाली. त्यानंतर कसबा गणपती बेलबाग चौकात पोचला आणि विसर्जन मिरवणूकीला सुरवात झाली.
विसर्जन मिरवणुकीत 'कलावंत' ढोल ताशा पथकाकडून वादन केले. ढोल-ताशाच्या गजरात आणि ठिकठिकाणी रांगोळ्याच्या पायघड्या घालून बाप्पाला निरोप देण्यात आला. लक्ष्मी रोड परिसरामध्ये पहिले मानाचे गणपती मार्गस्थ करून मग त्या पाठोपाठ इतर गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली होती. पहिल्या मानाच्या गणपतीनंतर इतर मानाचे चार गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले.