'मंगलमूर्ती मोरया' अन् 'पुढच्या वर्षी लवकर या' असा जयजयकार करत पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 12:27 PM2021-09-19T12:27:34+5:302021-09-19T12:27:44+5:30
मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पहार अर्पण
पुणे : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अन् पुढच्या वर्षी लवकर या, असा जयजयकार करत पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. फुलांची उधळण आणि भक्तगणांच्या जल्लोषात मानाचा पहिला श्री कसबा गणपतीचे सकाळी ११.३० वाजता विसर्जन झाले. मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुष्पहार अर्पण केला. परंपरेप्रमाणे श्रींची मूर्ती पालखीतून मांडवाजवळील कृत्रिम हौदापाशी आणल्यावर आरती करण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष श्रीकांत शेटे आणि कार्यकर्त्यांच्या हस्ते बाप्पाला निरोप देण्यात आला.
तांबडी जोगेश्वरी
मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीला महापौरांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर सकाळी ११.३५ वाजता मूर्तीचे मांडवाजवळ कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.
गुरुजी तालीम मंडळ
मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाला महापौर दुपारी साडेबारा वाजता पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर गुलालाची उधळण करून मांडवाजवळील कृत्रिम हौदात मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल.
तुळशीबाग
मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीला महापौर दुपारी सव्वा वाजता पुष्पहार अर्पण करतील. श्री तुळशीबाग मंडळाने आकर्षक गजकुंड केलेले असून त्यावर फुलांची सजावट असणार आहे. पारंपरिक धार्मिक पद्धतीने उत्सव मंडपात गणरायाचे विसर्जन मंडळाचे अध्यक्ष विकास पवार यांच्या हस्ते होणार आहे.
केसरी गणेशोत्सव
मानाचा पाचवा केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या श्रींची मूर्ती परंपरेनुसार पालखीतून मांडवात आणली जाईल. महापौर दुपारी दोन वाजता गणपतीच्या मूर्तीला आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर मांडवातील कृत्रिम हौदात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
भारतातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मूर्तीला महापौर दुपारी पाउणे तीन वाजता पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर मांडवाजवळीला कृत्रिम हौदात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने श्रींच्या मूर्तीचे विसर्जन आणि उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात होणार आहे. सूर्यास्ताच्यावेळी सायंकाळी सहा वाजून ३६ मिनिटांनी मंदिरामध्ये मूर्तीचे विसर्जन होणार आहे. हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. ट्रस्टने केलेल्या ऑनलाइन दर्शन सेवेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्राद्वारे कौतुक केले आहे.
www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live
अखिल मंडई मंडळ
अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे विसर्जन सायंकाळी साडेसहा वाजता महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे. विसर्जनासाठी मंडळाने मांडवाजवळ गजगवाक्ष अमृत कलश तयार केला आहे.
'मंगलमूर्ती मोरया' अन् 'पुढच्या वर्षी लवकर या' असा जयजयकार करत पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात. #AnantChaturdashi2021#GaneshVisarjan#Punepic.twitter.com/dcZ27ztONZ
— Lokmat (@MiLOKMAT) September 19, 2021