पीओपींच्या गणेश मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन यंदा अशक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 02:48 PM2022-09-01T14:48:04+5:302022-09-01T14:48:13+5:30
पीओपींच्या मूर्तींना बंदी असल्याने अमोनियम बाय कार्बोनेटची खरेदी नाही
पुणे : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तीं उत्पादनावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदी घातली असल्याने, पीओपी मुर्ती विरघळण्यासाठी आवश्यक असलेली अमोनियम बायकार्बोनेट पावडर महापालिकेने खरेदी केलेली नाही. त्यामुळे गणेश भक्तांना पीओपीच्या गणेश मूर्ती घरच्या घरी विसर्जन करणे यंदा अशक्य आहे.
नैसर्गिक जलस्त्रोतात गणेश मुर्तींचे विसर्जन करू नये, असे आवाहन करतानाच महापालिकेने गणेश मुर्तींचे घरच्या घरी विसर्जन करावे अथवा फिरत्या हौदात किंवा मुर्ती दान करावे असे सांगितले आहे. परंतु या तीन पर्यायांपैकी पहिल्या पर्यायात केवळ शाडूच्या गणेश मुर्ती घरच्या घरी विसर्जित करता येऊ शकणार आहेत. कारण पीओपी गणेश मूर्ती पाण्यात विरघळत नाहीत. ही मुर्ती विरघळण्यासाठी महापालिकेकडून दरवर्षी नागरिकांना मोफत अमोनियम बायकार्बोनेट पावडर क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर उपलब्ध करून दिली जाते. गणेश भक्तांनी ’घराच्या घरी गणेशमूर्तीचे विसर्जन करावे, यासाठी पालिकेने गतवर्षी २०० मे. टन अमोनियम बायकार्बोनेट पावडर खरेदी करून ती वितरीत केली होती. परंतु यंदा पीओपींच्या मुर्ती उत्पादनावर बंदी असल्याने या मुर्ती दान देणे किंवा प्रशासनाने व्यवस्था केलेल्या हौदांमध्येच विसर्जन करणे, याशिवाय दुसरा पर्याय गणेश भक्तांसमोर राहिलेला नाही.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मूर्ती विसर्जन बाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र प्रदुषण मंडळाने पीओपीच्या मूर्त्यांवर बंदी संदर्भात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेनेही पीओपीच्या मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्याचे आदेश मे महिन्यात काढले होते. परंतु या मुर्ती शाडू माती पेक्षा स्वस्त असल्याने व त्यांची निर्मिती पूर्वीपासून बाजारात होत असल्याने या मुर्त्यांचीच जास्त विक्री यंदा झाली आहे. परिणामी कारवाईत यंदाच्या वर्षी काहीसी सवलत देण्यात आल्याने गणेश भक्तांनी पीओपीच्या मूर्त्यांची खरेदी केलेली आहे. मात्र, महापालिकेने अमोनियम बायकार्बोनेट पावडर खरेदी केलेली नसल्याने, भाविकांना गणेश विसर्जनासाठी महापालिकेने व्यवस्था केलेल्या विसर्जन हौदात किंवा मूर्ती संकलन केंद्रात मुर्ती द्यावी लागणार आहे.