कडक बंदोबस्तात शांततेत विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:13 AM2021-09-21T04:13:21+5:302021-09-21T04:13:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मानाचे व इतर सार्वजनिक मंडळांनी निर्धारित केलेल्या नियमांचे ...

Immersion in peace under tight security | कडक बंदोबस्तात शांततेत विसर्जन

कडक बंदोबस्तात शांततेत विसर्जन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मानाचे व इतर सार्वजनिक मंडळांनी निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करून साधेपणाने उत्सव साजरा केला. विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच रस्त्यावर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मागील वर्षीप्रमाणेच या वर्षीही विसर्जन मिरवणुकांना परवानगी नव्हती. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर विशेष ताण आला नाही.

विसर्जनाच्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून शहरासह मुख्य पेठांत बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गणपतीच्या विसर्जनास सकाळी १० वाजता सुरुवात करण्यात आली होती. प्रत्येक मानाच्या गणपतीच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करून मंडळानुसार अधिकारी नेमले होते. त्यांना मंडळाच्या पदाधिकाऱ्र्यांसोबत समन्वय ठेवून विसर्जन साध्या पद्धतीने हौदातच करण्यास सांगितले जात होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे हे बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन सूचना देत विशेष लक्ष ठेवत होते.

मंडळांजवळ गर्दी होऊ नये म्हणून मध्यवस्तीमधील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. वाहतूक व स्थानिक पोलीस ठाण्यांकडून ठिकठिकाणी बॅरिकेड करून रस्ते बंद करण्यात आले होते. पोलिसांच्या मदतीला दंगल नियंत्रणासाठी १० पथके, राज्य राखीव पोलीस दलाच्या ४ प्लाटून तैनात केल्या होत्या. विसर्जनाच्या अगोदर बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून परिसराची पाहणी केली जात होती. गुन्हे शाखेची पथके देखील बंदोबस्तामध्ये सहभागी झाली होती. वाहतूक शाखेचे पोलीस चौका-चौकांत थांबवून वाहतुकीचे नियोजन करत होते.

........

शहरातील ३ हजार ५४० सार्वजनिक मंडळांपैकी ३ हजार ४९३ मंडळांनी उत्सव साजरा केला. तर, ४ लाख ३२ हजार ५४८ घरगुती गणपतींची स्थापना झाली होती. मागील वर्षीच्या तुलनेत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ४७ सार्वजनिक गणेश मंडळे उत्सवात सहभागी झाले नाहीत.

...

सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तींचे रात्री २३.१५ वाजता विसर्जन पूर्ण झाले.

........

शासनाने आखून दिलेल्या आचारसंहितेचे पालन करीत गणेशोत्सव शांततेत पार पडला. नियम पाळून सहकार्य केल्यामुळे मी पुणेकरांचे मन:पूर्वक आभार मानतो,

अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर

Web Title: Immersion in peace under tight security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.