विसर्जन मिरवणूक : ३३ रुग्णांना आॅक्सिजनद्वारे जीवदान, मिनी हॉस्पिटलद्वारे ३,८०० जणांना उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:28 AM2017-09-08T02:28:12+5:302017-09-08T02:28:23+5:30
निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने गणेशभक्त आणि पोलिसांसाठी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या मिनी हॉस्पिटलमध्ये गर्दीमध्ये पुरेसा आॅक्सिजन न मिळाल्याने बेशुद्ध पडलेल्या बारा जणांना वेळीच उपचार देण्यात आले.
पुणे : निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने गणेशभक्त आणि पोलिसांसाठी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या मिनी हॉस्पिटलमध्ये गर्दीमध्ये पुरेसा आॅक्सिजन न मिळाल्याने बेशुद्ध पडलेल्या बारा जणांना वेळीच उपचार देण्यात आले. गेल्या बारा दिवसांमध्ये उत्सवात ३ हजार ८०० हून
अधिक गणेशभक्त आणि पोलिसांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
राजगुरुनगरवरून ९२ वर्षांचे वयोवृद्ध पुण्याची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आले होते. दरम्यान, मोठ्या प्रमाणात असणाºया गर्दीमुळे आॅक्सिजनचा पुरवठा न झाल्याने ते बेशुद्ध पडले. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांना निरंजन सेवाभावी संस्थेच्या मिनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे अध्यक्ष जयेश कासट यांनी सांगितले.
या हॉस्पिटलमध्ये २० डॉक्टरांसह रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. कोणत्याही सुटी अथवा सवलतीशिवाय पोलीस बंदोबस्त करीत होते. या बंदोबस्ता दरम्यान पोलीस तसेच नागरिकांना हृदयविकाराचा सौम्य झटका, दम्याचा झटका, रक्तदाब, मधुमेह, अचानक चक्कर येणे, फिट येणे, मार लागून रक्तस्राव, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी अशा अनेक तक्रारी उद्भवल्या. त्यांचे उपचार या हॉस्पिटलमध्ये करण्यात आले. यातील ६० टक्के रुग्णांना अशक्तपणा, चक्कर येणे, रक्तदाब यांसारखे आजार होते. तर, २० टक्के रुग्णांना मधुमेह, आॅक्सिजनची कमतरता यांसारखे आजार आढळून आले. तसेच, १० टक्के रुग्ण गर्दीमध्ये गुदमरण्याची तक्रार घेऊन आले होते.