मराठवाड्याच्या व्यापक विकासाशिवाय महाराष्ट्राची प्रगती अशक्य : डॉ. श्रीपाल सबनीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 07:56 PM2018-10-04T19:56:25+5:302018-10-04T19:59:57+5:30

उसाची शेती आणि साखर कारखान्यांच्या जोरावर पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या समृद्धीमागे मराठवाड्यातील ऊस तोडणी कामगारांचे कष्ट आहेत.

Impact of Maharashtra without the comprehensive development of Marathwada: Dr. Shripal Sabnis | मराठवाड्याच्या व्यापक विकासाशिवाय महाराष्ट्राची प्रगती अशक्य : डॉ. श्रीपाल सबनीस 

मराठवाड्याच्या व्यापक विकासाशिवाय महाराष्ट्राची प्रगती अशक्य : डॉ. श्रीपाल सबनीस 

Next
ठळक मुद्देअ‍ॅड. वर्षा देशपांडे लिखित ‘कोयत्याच्या मुठीत’ या ग्रंथाचे रसिकार्पण

पुणे : उसाची शेती आणि साखर कारखान्यांच्या जोरावर पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या समृद्धीमागे मराठवाड्यातील ऊस तोडणी कामगारांचे कष्ट आहेत. या कामगारांच्या कुटुंबांना आणि विशेषत: त्यांच्या मुलींना ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, ते अतिशय विदारक सत्य आहे. हे वास्तव लक्षात घेता  मराठवाड्याच्या व्यापक विकासाशिवाय महाराष्ट्राची प्रगती अशक्य आहे, असे मत ज्येष्ठ समीक्षक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. 
कविता रसिक मंडळीच्या वतीने लेक लाडकी अभियान आयोजित समारंभात अ‍ॅड. वर्षा देशपांडे लिखित ‘कोयत्याच्या मुठीत’ या ग्रंथाचे रसिकार्पण डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य भाऊसाहेब जाधव, कविता रसिक मंडळीचे प्रमुख भूषण कटककर, अ‍ॅड. वर्षा देशपांडे, डॉ. राजेंद्र माने, कैलास जाधव, सिंधू ठोंबरे, सीमा बडे आणि सुप्रिया जाधव उपस्थित होते.
 सबनीस म्हणाले, महाराष्ट्राला असलेल्या सामाजिक चळवळीच्या पार्श्वभूमीवर समकालीन प्रश्न मांडणारा हा एक महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आहे. बालविवाह हे एक विदारक सत्य आहे. विकासाच्या प्रारूपाला या पुस्तकाच्या माध्यमातून प्रश्नांकीत केले आहे.शहरी व ग्रामीण समाजातील वैचारीक दरी इतकी भीषण आहे की, एक समाज होरपळत असताना दुसरा समाज उत्सवप्रेमी व आत्ममग्न झालेला आहे.
भूषण कटककर म्हणाले, की मुलगी जन्माला आली तर आपल्या स्थलांतराच्या भिन्न जीवनशैलीमुळे त्या मुलीला सुरक्षित ठेवताच येणार नाही म्हणून मुलीला जन्माला घालायलाच नको असे गर्भपाताचे एक धक्कादायक व निराळेच कारण ह्या पुस्तकाद्वारे समोर आलेले आहे. त्यातूनही मुलीचा जन्म झाला तर तिला सुरक्षित ठेवता येत नसल्याने शक्य तितक्या लवकर तिचे लग्न लावून देण्याचाही प्रकार असाच अमानवी आहे. आपण माणूस म्हणून पुरेसे उत्क्रांतच झालेलो नाहीत असे म्हणायला वाव आहे. 
वर्षा देशपांडे म्हणाल्या, की ऊसदर वाढीसाठी आंदोलन होते, पण ऊसतोड कामगारांच्या वेतनासाठी, सुरक्षेसाठी त्यांच्या विम्यासाठी कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही,  हे दुर्दैव आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबांचे प्रश्न पोहोचण्याच्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे. बालविवाह हा या क्षेत्रातील महत्वाचा प्रश्न आहे. 
यावेळी सोनाली बडे आणि सिंधू ठोंबरे या बालविवाहितांनी अनुभव कथन केले. त्याद्वारे ऊसतोडणी कामगारांच्या मुलींच्या नशिबी लहान वयातच येत असलेल्या भीषण संघर्षाचे दारूण चित्र आणि त्याविरुद्ध दिलेल्या प्रखर लढ्याची कथा ऐकायला मिळाली. सुप्रिया जाधव यांनी सूत्रसंचलन केले, तर वर्षा कुलकर्णी यांनी आभार मानले.  

Web Title: Impact of Maharashtra without the comprehensive development of Marathwada: Dr. Shripal Sabnis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.