जनजागृतीचा परिणाम : हौद व टाकीतील विसर्जनाला वाढता प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 02:20 AM2018-09-25T02:20:50+5:302018-09-25T02:21:06+5:30
नदीपात्र प्रदूषित होत असल्यामुळे त्यात मूर्ती विसर्जित न करण्याच्या आवाहनाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळतो आहे.
पुणे - नदीपात्र प्रदूषित होत असल्यामुळे त्यात मूर्ती विसर्जित न करण्याच्या आवाहनाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळतो आहे. यंदाच्या वर्षी नदीपात्रात १ लाख ३ हजार ६७५ मूर्तींचे विसर्जन झाले, तर हौद व टाक्यांमध्ये तब्बल ३ लाख १८ हजार ४६४ मूर्ती विसर्जित झाल्या. एकूण ६७६ टन निर्माल्य जमा झाले.
शहरात सहा लाखांपेक्षा अधिक मूर्तीची दरवर्षी प्रतिष्ठापना होत असते. मूर्ती विसर्जन करण्यासाठी हौदांची व्यवस्था महापालिका करते. शहरातील १८ घाटांवर, तसेच २१० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. ६५५ पेक्षा अधिक निर्माल्य कलश, तसेच १ हजार ३५९ कंटेनर उपलब्ध करून देण्यात आले होते. ५ लाख २७ हजार ३१९ गणेश मूर्तींचे यावर्षी ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. त्यातील घाटांवर ५५ हजार ६९० मूर्ती विसर्जित झाल्या. हौदात १ लाख १९ हजार ७२ व टाक्यांमध्ये १ लाख १९ हजार ३९२ मूर्तींचे विसर्जन झाले. नदीपात्रात १ लाख ३ हजार ६७५, तर कॅनॉलमध्ये १ लाख ९ हजार ८७३ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. तलाव व विहिरींमध्ये अनुक्रमे ११ हजार ४३० व २ हजार ९८१ मूर्तींचे विसर्जन झाले. एका प्रायोजकाने दिलेल्या हौदांमध्ये ५ हजार ९३ मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. विसर्जनाची सर्व ठिकाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्याने सुरक्षित करण्यात आली होती. नदीपात्राच्या ठिकाणी एकूण २ हजार ४०१ जीवरक्षक नियुक्त होते. स्वच्छता कर्मचाºयांचीही स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यात आली होती. महापालिकेचे एकूण ९ हजार कर्मचारी स्वच्छतेपासून ते मंडळांच्या स्वागत कक्षापर्यंत राबत होते. पोलीस तसेच मंडळांच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेतील या कर्मचाºयांनीही जबाबदारी पार पाडली.