यवतच्या सरपंचांवर तोतयागिरीचा गुन्हा
By Admin | Published: January 25, 2016 12:58 AM2016-01-25T00:58:02+5:302016-01-25T00:58:02+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविल्यानंतरही ग्रामपंचायतीच्या कामकाजात सह्यांचा वापर केल्याने सरपंच रजिया अजमुद्दीन तांबोळी यांच्यावर तोतयागिरी केल्याचा गुन्हा यवत पोलिसांनी दाखल केला आहे.
यवत : जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविल्यानंतरही ग्रामपंचायतीच्या कामकाजात सह्यांचा वापर केल्याने सरपंच रजिया अजमुद्दीन तांबोळी यांच्यावर तोतयागिरी केल्याचा गुन्हा यवत पोलिसांनी दाखल केला आहे.
याबाबतची तक्रार ग्रामपंचायत सदस्या मनीषा सचिन बधे यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : यवत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर असलेल्या रजिया तांबोळी यांना अपर जिल्हाधिकारी यांनी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याचे कारणावरून अपात्र ठरविले होते. त्यांच्याविरोधात गावातील रोहन कैलास दोरगे व अशोक जांबले यांनी २५ आॅगस्ट २०१५ रोजी सरकारी जागेवर अतिक्रमण असल्याचा अर्ज जिल्हाधिकारी यांच्याकडे केला होता.
या प्रकरणात सुनावणी होऊन दि. २३ डिसेंबर २०१५ रोजी अपर जिल्हाधिकारी यांनी यवत ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संपत वाबळे यांना सरपंच रजिया तांबोळी यांना पदावरून अपात्र ठरविण्यात आल्याबाबतचे पत्र पारित केले होते, तर या पत्राची प्रत सरपंच रजिया तांबोळी यांना दि. २४ डिसेंबर २०१५ रोजी आदा करण्यात आली होती. तरीही त्यांनी सह्यांचे अधिकार वापरून ग्रामपंचायत कारभार सुरू ठेवला होता. दि. १४ जानेवारी २०१६ रोजी ग्रामपंचायतीच्या सभेचे सूचनापत्र रजिया तांबोळी यांनी त्यांच्या व ग्रामविकास अधिकारी यांच्या सहीनिशी पाठवले होते.
मनीषा बधे यांनी तक्रार दिल्यानंतर भा.द.वि. कलम १७0 अन्वये तोतयागिरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. एस. वाघ करीत आहेत. (वार्ताहार)