बजेटची प्रभावी अंमलबजावणी करा
By admin | Published: May 22, 2017 04:57 AM2017-05-22T04:57:44+5:302017-05-22T04:57:44+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकाची प्रभावी आणि शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी, यासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी पुढाकार घेतला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंदाजपत्रकाची प्रभावी आणि शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी, यासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी पुढाकार घेतला आहे. सावळे यांनी सहा क्षेत्रीय कार्यालयनिहाय सर्वपक्षीय नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन अंदाजपत्रकात प्रत्येक प्रभागातील कामांसाठी केलेली तरतूद आणि ते खर्च करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या स्तरावर सुरू असलेल्या नियोजनाबाबत त्यांनी व नगरसेवकांनी चर्चा केली.
सर्व नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कामांची माहिती देण्यात आली. स्थायीच्या अध्यक्षा सावळे यांनी होणाऱ्या कामांनाच प्राधान्य देण्याचे तसेच कामांची निविदा प्रक्रिया ३० जूनपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेचे अंदाजपत्रक दर वर्षी तयार केले जाते. त्यामध्ये विविध विकासकामांची तरतूद असते. मात्र, दर वर्षी ४० टक्के अंदाजपत्रक खर्च होत नाही. अंदाजपत्रकात कामांची तरतूद करूनही नियोजनाअभावी ती मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. त्यातच निवडून आलेल्या नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक नवीन आहेत. या नवीन नगरसेवकांना प्रभागातील कोणत्या कामांचा अंदाजपत्रकात समावेश केला आहे, याची पूर्ण माहिती व्हावी, यासाठी सावळे यांनी सहा क्षेत्रीय कार्यालयनिहाय सर्वपक्षीय नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकांद्वारे सावळे यांनी अंदाजपत्रकाची प्रभावी आणि शंभर टक्के अंमलबजावणी व्हावी यासाठी नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रीय कार्यालयनिहाय झालेल्या बैठकांमध्ये कोणत्या विकासकामांचा उल्लेख आहे आणि त्यासाठी किती रक्कमेची तरतूद केली आहे, याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्याचे संबंधित प्रभागाच्या चारही नगरसेवकांना सादरीकरण केले. अंदाजपत्रकातील कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी सर्वपक्षीय नगरसेवकांनी अपेक्षा व्यक्त केली.