‘कोरेगाव भीमा विकास आराखड्याची अंमलबजावणी करा’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 02:54 AM2020-01-02T02:54:49+5:302020-01-02T02:55:13+5:30
शासनाने या परिसराच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
मुंबई : दरवर्षी शौर्यदिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या जनतेला आवश्यक सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी विकास आराखड्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. शासनाने या परिसराच्या विकासासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी केली.
विजयस्तंभ अभिवादन सभेत आठवले म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी त्याचा शेतकºयांना लाभ होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शासनाने शेतकºयांचा सातबारा कोरा करण्यासंदर्भात ठोस भूमिका घ्यावी. तसेच राज्य सरकारच्या विविध मागासवर्गीय महामंडळांचीही कर्जमाफी करावी आणि मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून मुस्लिमांना भडकवले जात आहे. मात्र, या कायद्यामुळे मुस्लिमांच्या अस्तित्वाला कोणताही धोका नाही. मुस्लिमाना धोका असल्याचे जाणवले, तर आपला पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील, असेही आठवले सांगितले.