इंजिनिअरिंग महाविद्यालत ‘अवसरी पॅटर्न’ राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:15 AM2021-09-08T04:15:09+5:302021-09-08T04:15:09+5:30
--- मंचर : शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिल्याने आज आंबेगाव तालुक्यात कमी क्षेत्रातही शेतकरी आपले कुटुंब चालवत आहे. त्याला ...
---
मंचर : शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिल्याने आज आंबेगाव तालुक्यात कमी क्षेत्रातही शेतकरी आपले कुटुंब चालवत आहे. त्याला उच्च शिक्षणाची जोड मिळाल्यास शेतकऱ्याची मुले मागे राहणार नाही. राज्यातील इतर इंजिनिअरिंग कॉलेजपेक्षा अवसरीचे कॉलेज वेगळे आहे. मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे चालू असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजचे काम ‘अवसरी पॅटर्न’ डोळ्यांसमोर ठेवून करावे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले.
अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे आयोजित शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयांच्या विस्तारित इमारतीचा शुभारंभ व एकत्रित सभागृह इमारतीच्या भूमिपूजन समारंभप्रसंगी पवार बोलत होते. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना उपनेते संजय राऊत, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवदत्त निकम, आमदार अतुल बेनके उपस्थित होते.
पवार म्हणाले की, जेव्हा आपले सरकार नसते तेव्हा देखील तालुक्याचा विकास कसा करावा हे वळसे पाटलांकडून शिकावे. तालुक्यात त्यांनी शेतीबरोबरच शिक्षणक्षेत्रात मोठे काम केल्यामुळे शेतकऱ्यांची मुले मागे राहणार नाहीत. कुकडी, मीना असे प्रकल्प राबवून या भागात बंधाऱ्याचे जाळे निर्माण केले. त्यामुळे शेती सुपीक झाली. द्राक्ष, ऊस यांचे क्षेत्र वाढले. आज तालुक्यात १६ लाख लिटर दूध गोळा होत आहे.
संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र पुरोगामी राज्य का आहे हे आंबेगावमध्ये आल्यावर पाहायला मिळाले. शहरात मोठ्या प्रमाणावर नाट्यगृहे आहेत. आता ग्रामीण भागात नाट्यगृह होणार असल्यामुळे ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. अवसरी अभियांत्रिकी कॉलेज पाहिले असता वळसे-पाटील यांनी ग्रामीण भागात शैक्षणिक नंदनवन उभारले आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, शहाराप्रमाणे ग्रामीण भागातील कलाकारांना आपली कला जोपासण्यासाठी, तसेच विद्यार्थी व नागरिकांना नाटकांची आवड तसेच नाटके पाहण्याची संधी आता तालुक्यात उपलब्ध होणार आहे.
पूजा थिगळे हिने सूत्रसंचालन केले.
--
कोट
आता ग्रामीण भागातील नागरिकांना नाटक पाहण्यासाठी रसिकांना पुण्यासारख्या शहरात न जाता तालुक्यात उपलब्ध होणार आहे. हे कलाकार व रसिकांसाठी मोठी मेजवानी ठरणार आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना नेते
--
०७मंचर अवसरी येथे भूमीपूजन