विद्यार्थ्यांवर शुल्कवाढीचा भार, नवीन विद्यापीठ कायद्यानुसार पुढील वर्षीपासून अंमलबजावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:51 AM2018-06-20T00:51:45+5:302018-06-20T00:51:45+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये वाढ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्ये वाढ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, महाविद्यालयांना पुढील शैक्षणिक वर्षापासून दरवर्षी वाढीव शुल्काची आकारणी करता येईल. परिणामी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खांद्यावर वाढीव शुल्काचा भार पडणार नाही.
नवीन विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक विद्यापीठात शुल्क निर्धारण समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने मंजूर केलेल्या आणि विद्यापीठाच्या अधिकार मंडळांनी मान्यता मिळाल्यावर महाविद्यालयांना वाढीव शुल्क घेता येणार आहे. त्यातच महाविद्यालयांकडून केल्या जाणाºया खर्चानुसार विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी करता येईल, अशीही तरतूद नवीन कायद्यात करण्यात आली आहे. जळगाव विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या शुल्क निर्धारण समितीची बैठक मंगळवारी विद्यापीठात घेण्यात आली. या बैठकीस विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. व्ही. बी. गायकवाड, डॉ. विजय खरे, डॉ. प्रफुल्ल पवार, उपकुलसचिव विकास पाटील, उत्तम चव्हाण आदी उपस्थित होते.
विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अहमदनगर, नाशिक व पुणे या तीन जिल्ह्यांमधील महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. मात्र, २०१२ पासून विद्यापीठाकडून या अभ्यासक्रमाच्या शुल्कात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. शुल्कवाढ न केल्याने महाविद्यालयांना आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.
महाविद्यालयातील पायाभूत सुविधांवर खर्च करण्याबरोबरच प्राध्यापकांच्या वेतनावर होणारा खर्च शिक्षणसंस्थांच्या क्षमतेच्या बाहेर जाऊ लागला आहे. परिणामी विद्यापीठाच्या शुल्क निर्धारण समितीकडून शुल्क निश्चिती करून घ्यावी, अशी मागणी संस्थाचालकांकडून केली जात होती. त्यामुळे विद्यापीठाच्या शुल्क निर्धारण समितीने शुल्कवाढीची प्रक्रिया सुरू केली आहे.
>अभ्यासक्रमाबाबत चर्चा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शुल्क निर्धारण समितीच्या बैठकीत मंगळवारी विद्यापीठातील विविध विभागांमधील अभ्यासक्रमांचा व संलग्न महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. एकूण किती अभ्यासक्रम शिकवले
जातात व त्यासाठी किती शुल्क आकारले जाते याचा आढावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. कायद्यानुसार
विद्यार्थ्यांना वाढीव शुल्कवाढीची सहा महिने आधी कल्पना देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षी शुल्कवाढ होणार नाही.
- डॉ. आर. एस. माळी,
माजी कुलगुरू,
जळगाव विद्यापीठ
>कला, वाणिज्य, विज्ञानमध्ये शुल्कवाढ
विद्यापीठाशी संलग्न शासकीय व स्वायत्त महाविद्यालय वगळता सर्व महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य, विज्ञान आदी विद्याशाखांच्या अभ्यासक्रमाच्या शुल्कात वाढ होणार आहे.
प्रथमत: सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून किती शुल्क आकारता येईल; याबाबतचा निर्णय विद्यापीठाच्या समितीकडून जाहीर केला जाईल.
मात्र, एखाद्या महाविद्यालयास शुल्क निर्धारण समितीने केलेली शुल्कवाढ अमान्य असेल तर समितीकडे याबाबत दाद मागता येईल. तसेच महाविद्यालयाकडून केला जाणारा खर्च दाखवून वाढीव शुल्क घेण्यास परवानगी मागता येईल.