प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राण्यांना भूल देण्यासाठीचे औषध करणार आयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:06+5:302021-06-10T04:08:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात ६२ प्रजातींच्या ४२५ वन्य प्राण्यांना वेळोवेळी आजाराचे निदान करण्यासाठी व विविध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात ६२ प्रजातींच्या ४२५ वन्य प्राण्यांना वेळोवेळी आजाराचे निदान करण्यासाठी व विविध चाचण्या घेताना, तसेच एका खंदकातून दुसऱ्या खंदकात स्थलांतरित करताना भूल देणे आवश्यक ठरते़ याकरिता भुलीचे औषध दक्षिण अफ्रिकेतून मागविण्यात येणार असून, याकरिताच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे़
सध्या महापालिका हे भुलीचे औषध अन्य राज्यातून मागवित होते़ मात्र, हे औषध सहजासहजी मिळत नसल्याने, महापालिकेने भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून यांच्याशी संपर्क साधला़ तेव्हा सदर भुलीचे औषध वाईल्डलाईफ फार्मास्युटिकल्स दक्षिण अफ्रिका यांच्याकडून प्राप्त होईल असे सांगण्यात आले़ त्यानुसार महापालिकेने त्यांच्याशी ई-मेलव्दारे संपर्क साधून या औषधाची मागणी केली़ परंतु, कंपनीच्या धोरणानुसार औषधांच्या आयात प्रक्रियेतील सर्व परवानग्या व सोपस्कार पूर्ण झाल्यावर त्यांना अगोदर औषधाचे पैसे द्यावे लागणार असून त्यांनतर हे औषध कंपनीकडून देण्यात येणार आहे़ त्यामुळे या सर्व परवानग्यांसाठी येणाऱ्या खर्चासह, औषध खरेदीसाठीच्या १ लाख ३५ हजार ५८१ रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आह़े
----------------------
‘नॅशनल वॉर मेमोरियल’च्या नूतनीकरणाकरिता ३० लाख रुपये
घोरपडी येथील ‘नॅशनल वॉर मेमोरियल’ हे पर्यटनस्थळ म्हणून सन २००६ पासून सुरू करण्यात आले असून, येथे संरक्षणविषयक संग्रहालय, वॉर मेमोरियल, रणगाडे, युध्दामध्ये वापरलेली आयुधे पाहण्यास उपलब्ध आहेत़ याठिकाणी पुणे महापालिकेची पुणे दर्शन बसही जात असते़ यामुळे या स्थळाच्या नूतनीकरणासाठी ३० लाख रुपये खर्च करण्यासह,ही रक्कम संबंधित ठेकेदारास अदा करण्यासही स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली़
------------------