जेवणातील प्रथिनांचे महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:10 AM2021-09-13T04:10:15+5:302021-09-13T04:10:15+5:30

प्रोटिन किंवा प्रथिनं आपल्या आरोग्यासाठी आवश्य पोषणमूल्य आहे. प्राणिजन्य पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींना, बऱ्याचदा पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात. कोणतेही ...

The importance of protein in the diet | जेवणातील प्रथिनांचे महत्त्व

जेवणातील प्रथिनांचे महत्त्व

Next

प्रोटिन किंवा प्रथिनं आपल्या आरोग्यासाठी आवश्य पोषणमूल्य आहे. प्राणिजन्य पदार्थ खाणाऱ्या व्यक्तींना, बऱ्याचदा पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात. कोणतेही प्रोटिन (प्रथिनं)चांगल्या प्रतिचे होण्यासाठी त्यात ९ विशेष घटक (९ एसेंशयल अमिनो ॲसिड) असणे आवश्यक आहे. वनस्पतिजन्य पदार्थांत बऱ्याचदा या ९ पैकी एक किंवा अधिक घटक नसतात किंवा कमी प्रमाणात असतात आणि त्यामुळेच शाकाहारी किंवा वनस्पतिजन्य प्रथिने संपूर्ण प्रथिने समजली जात नाहीत.

पण मग शाकाहारी लोकांना संपूर्णपणे प्रथिने मिळतच नाहीत. तर असं अजिबात नाही. पहिली गोष्ट आपल्याकडे शाकाहारी व्यक्तीसुध्दा दूध, दही, पनीर असे प्राणिजन्य पदार्थ घेतात. हे पदार्थ योग्य प्रमाणात घेतले तर आवश्यक ती प्रथिने तसेच कॅल्शियमसारखी इतर पोषणमूल्ये देखील मिळतात. पण हल्ली अनेक लोक, आरोग्याच्या दृष्टीने किंवा इतर काही कारणांसाठी व्हेगन (प्राणिजन्य पदार्थांचा संपूर्ण अभाव) जीवनशैली आत्मसात करतात. असे लोक मुख्यत: प्रथिनांसाठी डाळी व कडधान्ये यावर अवलंबून असतात. परंतु, वर म्हणाल्याप्रमाणे, या पदार्थांत काही आवश्यक घटकांचा अभाव असल्याने त्यांना संपूर्ण प्रथिने मिळणे अवघड होऊ शकते.

अशा व्यक्तींनी, चांगल्या प्रतिची व पुरेशी प्रथिने मिळण्यासाठी, वेगवेगळ्या डाळी-कडधान्ये वापरावीत, रोज फक्त तुरीच्या डाळीचे वरण न घेता, कधी मूग, कधी मसूर तर कधी मिश्रडाळीचे वरण किंवा आमटी अवश्य घ्यावी. रोजच्या वरण आमटीमध्ये विविधता आणावी, जेणेकरून सर्व जण आवडीने खातील. जसे की मुगाच्या डाळीला, तूप, जिरे, लसूण अशी फोडणी छान वाटते. मसुराच्या आमटीची चव गरम मसाल्याने वाढते. थोडे आले खोबरे-आमसूल याने नेहमीचे वरणही आणखी चवदार होऊ शकते. पोळी/पराठे यासाठी कणिक भिजवताना, त्यात थोडे बेसन किंवा मुगाचे पीठ घालू शकतो.

हल्ली वजन कमी करण्यासाठी अथव मधुमेहामुळे अनेक लोकं भात टाळतात आणि त्यामुळे वरण, आमटी खाल्ले जात नाही. तसे होत असल्यास जाणीवपूर्वक वाटीत वरण-आमटी घेऊन खाणे गरजेचे आहे.

आपल्या परंपरेत असलेले धान्य व डाळी दोन्ही असणारे पदार्थ जसे थालिपीठ, मुगाच्या डाळीची खिचडी, मिश्र पिठाचे घावन तसेच दक्षिण भारतीय पदार्थ जसे डोसा, इडली असे पदार्थ आवश्य घ्यावे. धान्य आणि डाळी अथवा कडधान्य एकत्र आल्यास त्यातील प्रथिनांची प्रत उंचावण्यास मदत होते.

Web Title: The importance of protein in the diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.