'एमपीएससी' ची महत्वाची घोषणा; कोरोनाची लक्षणे असलेल्या उमेदवारांना 'पीपीई कीट' देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 01:07 PM2021-03-19T13:07:59+5:302021-03-19T13:08:17+5:30
'एमपीएससी'ने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष काळजी घेतली आहे.
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) राज्य पूर्व परीक्षा २१ मार्च होणार आहे. परीक्षेला सामोरे जण्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी पालन करावयाच्या मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक अधिकृत संकेतस्थळावर 'एमपीएससी'ने जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोविड १९ सदृश्य लक्षणे आढळून येत असतील त्यांना पीपीई किट उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.
'एमपीएससी'ने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या आयोजनासाठी विशेष काळजी घेतली आहे. या बाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करता यावे म्हणून पुन्हा परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना एमपीएससीकडून मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज दिले जाणार आहेत. असे असले तरी एमपीएससी ने दिलेल्या सूचनांचे पालन विद्यार्थाना करावेच लागणार आहे. जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, परीक्षा केंद्रात येताना उमेदवाराने तीन पदरी कापडाचे मास्क किंवा पट्टी बांधणे आवश्यक आहे. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी स्वच्छतेची काळजी घेऊन सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे आवश्यक आहे. ताप , सर्दी, खोकला, अशी लक्षणे असल्यास परीक्षा केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कळवणे बंधनकारक आहे. स्वतःचा जेवणाचा दाब घेऊन यावा. पाण्याची बाटली सोबत ठेवावी. राज्य सेवा पूर्व परीक्षेचे दोन पेपर असल्याने उमेदवाराला परीक्षा केंद्राबाहेर पडता येणार नाही. तसेच उमेदवाराने एकमेकांचे शैक्षणिक साहित्य वापरण्यास मनाई आहे. तसेच सुरक्षित अंतर पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.