दहशतवाद्यांबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती; ATS महासंचालकांकडून पुणे पोलिसांच्या कामाचे कौतुक

By विवेक भुसे | Published: July 26, 2023 07:39 PM2023-07-26T19:39:45+5:302023-07-26T19:43:19+5:30

तपासाचा आढावा घेण्यासाठी पोलीस महासंचालक दाते बुधवारी पुण्यात आले होते...

Important leads regarding terrorists; Appreciation of the work of Pune Police | दहशतवाद्यांबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती; ATS महासंचालकांकडून पुणे पोलिसांच्या कामाचे कौतुक

दहशतवाद्यांबाबत महत्त्वाचे धागेदोरे हाती; ATS महासंचालकांकडून पुणे पोलिसांच्या कामाचे कौतुक

googlenewsNext

पुणे : पुण्यात अटक केलेले दहशतवादी प्रशिक्षित असून, याप्रकरणाचा तपास प्रगतीपथावर आहे, त्यांच्याकडून महत्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याची माहिती महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक विभागाचे (एटीएस) पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दिली.

महंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे देशविघातक कृत्याबाबतचे साहित्य आढळून आले. तसेच, बॉम्ब कसा तयार करायचा, याची माहिती आढळून आली. तपासाचा आढावा घेण्यासाठी पोलीस महासंचालक दाते बुधवारी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

खान आणि साकी दोघे मूळचे मध्यप्रदेशातील रहिवासी असून रतलाम मॉडेलशी ते संबधित आहेत. ते गेल्या दीड वर्षांपासून पुण्याच्या कोंढवा परिसरात वास्तव्याला होते. मात्र, त्याबाबत कोणतीही माहिती पोलीस किंवा तपास यंत्रणांच्या हाती नव्हती. याप्रकरणात दोघांशिवाय अन्य कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. तसेच, शहरात लगेचच काही घातपात घडण्याचा त्यांचा कट असल्याबाबतची कोणतीही माहिती तपास यंत्रणांना मिळालेली नाही. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. तसेच या दोघांना हाताळणाऱ्या सूत्रधारांबाबत ( हँडलर्स) महत्वपूर्ण माहिती तपासात मिळाली आहे. येत्या दोन दिवसांत महत्वाचे धागेदोरे मिळतील, असे पोलीस महासंचालक दाते यांनी सांगितले. दोघांविरुद्ध विघातक कृत्ये घडवल्याचे कलम गुन्ह्यात लावण्यात आले आहे. काही जणांची चौकशी सुरु आहे, ही माहिती संवेदनशील असल्याने त्याबाबत आताच सांगणे शक्य नसल्याचे दाते यांनी सांगितले.

यामुळे डॉ. कुरुलकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नाही-
पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरविल्याप्रकरणातील डॉ. प्रदीप कुरुलकर याचाही तपास एटीएस करीत आहेत. त्याबाबत सदानंद दाते यांनी सांगितले की, डॉ. कुरुलकर याच्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्याबाबत सरकारी वकीलांचे मत घेण्यात आले होते. त्यांचा अभिप्राय विरोधी असल्याने ते कलम लावण्यात आलेले नाही. डॉ. कुरुलकर याची व्हाईस लेअर अनॉलिसिस टेस्ट करण्यात येणार आहे. त्याने पॉलिग्राफ चाचणीला विरोध केला आहे. निखिल शेंडे यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. एटीएसने काही महिलांचे जबाब नोंदविले आहेत. त्यात त्यांनी कुरुलकर याने अत्याचार केल्याचे सांगितले असले तरी त्यांना सध्या तरी तक्रार करायची नाही, असे सांगितले असल्याचे दाते म्हणाले.

Web Title: Important leads regarding terrorists; Appreciation of the work of Pune Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.