सोशल मीडिया युवकांसाठी महत्त्वाचे माध्यम - डॉ. आशुतोष जावडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 05:17 AM2018-03-11T05:17:06+5:302018-03-11T05:17:06+5:30
मला वाटते की, भारतीय माणसाच्या आत एक उत्सवी मन आहे. विविध प्रकारचे सण-उत्सव आपण साजरे करतो. त्यामुळे संमेलनावर आपण टीका करू नये, असे मत डॉ. आशुतोष जावडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
युवा साहित्य संमेलन हे पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांत न होता ते इस्लामपूरसारख्या परिघावर असलेल्या एका साहित्यिक ठिकाणी होत आहे, हे मला स्वागतार्ह वाटते. या संमेलनाने युवा पिढीला प्रेरणा मिळेल. संमेलनांवर अनेक वेळा टीका केली जाते. मला वाटते की, भारतीय माणसाच्या आत एक उत्सवी मन आहे. विविध प्रकारचे सण-उत्सव आपण साजरे करतो. त्यामुळे संमेलनावर आपण टीका करू नये, असे मत डॉ. आशुतोष जावडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
जावडेकर म्हणाले, मी एक युवा डेंटिस्ट जरी झालो असलो तरीही लेखकाला लिखाणासाठी किंवा गायकाला गाण्यासाठी कुठली डिग्रीच लागते असे मला वाटत नाही. माझी एका वाक्यात ओळख सांगायची म्हणजे, मी लिहितो, गातो आणि दात काढतो. यातला क्रमही महत्त्वाचा आहे. कारण पहिल्या क्रमांकाला मी लेखक आहे. त्यानंतर मी गाण्यातला माणूस आहे आणि त्याही नंतर तिसºया क्रमांकाला मी दात काढतो. तोही मी फक्त उपजीविकेचे साधन म्हणून नव्हे तर, मला ते काम जमते आणि आवडते. मला नेहमी वाटते, की हा क्रम कळायला तुमच्या आयुष्यातील पस्तिशी उलटावी लागते.
नाटकाविषयी सांगायचे, तर याविषयी युवा पिढीत एक जागरूकता आहे. तरुणांना त्याच्यामध्ये असलेली नाटकाची एक ऊर्मी म्हणजे अभिनय, संगीत, लेखन अशा सर्व कलांचा समन्वय असतो त्यामुळे त्यांना हे खूप आवडीचे वाटते. साहित्याविषयी युवा पिढीचा उत्साह हा त्यांच्या त्यांच्या कवितांमधून दिसतो. त्यांना अजूनही शब्दांमध्ये अभिव्यक्त व्हावेसे वाटते हे मला खूप महत्त्वाचे वाटते. आजच्या तरुण पिढीचे लेखन हे निराळे असणार आहे. निराळ्या प्रतलावरती चालणार आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या सोशल मीडियाच्या जगात तरुण मंडळी व्हॉट्स अॅपद्वारे जी चिन्हे पाठवतात किंवा छोटीशी चारोळी पाठवतात, त्यांचे संवाद हे नाटकासारखेच असतात. या सर्व गोष्टी बघता मला असे वाटते, की समाजाचे हे काम आहे, की त्यांच्यातील प्रतिभा ओळखून त्यांना योग्य ती दिशा देणे आणि ती फक्त व्हॉट्सअॅपच्या चॅटपुरती मर्यादित न राहता त्यातून काही चांगली निर्मिती होत राहणे होय.
सोशल मीडियामुळे अभिव्यक्त होण्यासाठी फेसबुक पेज, ब्लॉग या प्रकारचे अतिशय महत्त्वाचे माध्यम युवा पिढीला मिळाले आहे. मग हे लेखन भलेही कसदार नसेल पण, ते महत्त्वाचे आहे आणि मला ते साहित्याचे लोकशाहीकरण वाटते.
चांगली समीक्षा ही लेखकालाही दिशा देऊ शकते. ती मूळात स्वत: सर्जनशील असते. आपल्या मराठी समीक्षाने अत्यंत ढोबळ अशा निकषांमध्ये स्वत:ला अडकवून घेतले आहे. याचा परिणाम वाचक दुरावण्यात झाला.
अनुवाद ही दुय्यम गोष्ट नसून, तीही सर्जनशील असते. अनुवादाला उत्तम असा वाचक वर्गदेखील आहे. विविध भाषेतील पुस्तके अनुवादित होत असतात. अनुवादित पुस्तके ही मूळ पुस्तकांपेक्षा सरस असतात. कारण, अनुवादामुळे वेगवेगळ्या भाषांतील संस्कृतीचा परिचय आपल्याला होतो. मराठी भाषेतील पुस्तके दुसºया भाषेत अनुवादित व्हायला हवी, असे मला वाटते.