आयटीआय प्रशिक्षणार्थींसाठी महत्त्वाची बातमी! विद्यावेतनात केली वाढ, शासननिर्णय प्रसिद्ध
By प्रशांत बिडवे | Published: September 18, 2023 02:41 PM2023-09-18T14:41:10+5:302023-09-18T14:41:29+5:30
यासंदर्भात राज्य शासनातर्फे अध्यादेश जारी केला असून चाळीस वर्षांनंतर विद्यावेतनात वाढ केली आहे...
पुणे : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत मान्यता असलेल्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना दिले जाणारे विद्यावेतन प्रति महिना पाचशे रुपये केले आहे. यासंदर्भात राज्य शासनातर्फे अध्यादेश जारी केला असून चाळीस वर्षांनंतर विद्यावेतनात वाढ केली आहे.
आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून विद्यावेतन देण्यात येते. प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांपैकी ५० टक्के पात्र प्रशिक्षणार्थ्यांना विभागनिहाय ४० व ६० रुपये विद्यावेतन दिले जात हाेते. त्यामध्ये चाळीस वर्षांपासून काेणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. काही महिन्यांपूर्वी विद्यावेतनात ५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला हाेता. मात्र, वाढती महागाई लक्षात घेता एवढ्या अत्यल्प रकमेत खर्च भागविणे शक्य नव्हते. तसेच बहुसंख्य प्रशिक्षणार्थी सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील असल्याने विद्यावेतनाच्या दरामध्ये वाढ करण्यात आल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक समाजातील व खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील प्रशिक्षणार्थी विद्यावेतनासाठी पात्र आहेत. विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असणे, तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, अशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून दर महा ५०० रुपये विद्यावेतन देण्यात येईल. तीन महिन्यांच्या हप्त्यांत विद्यावेतन देण्यात येणार असून ८० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. तसेच दाेन वर्षांच्या अभ्यासक्रमातील दुसऱ्या वर्षातील विद्यावेतनाचा लाभ मिळविण्यासाठी प्रशिक्षणार्थी प्रथम वर्ष उतीर्ण हाेणे आवश्यक आहे.