प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! एक सप्टेंबरपासून रिक्षा भाडेदरात चार रुपयांची वाढ
By नितीश गोवंडे | Published: August 27, 2022 06:43 PM2022-08-27T18:43:54+5:302022-08-27T18:45:37+5:30
या निर्णयामुळे रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे....
पुणे : रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा चालकांची भाडेवाढ करण्यासंदर्भातील आदेश शनिवारी काढले. त्यानुसार रिक्षा चालकांनी आता चार रुपयांची भाडे वाढ करण्याची घोषणा करण्यात आली.
या निर्णयामुळे रिक्षा चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रिक्षा चालकांना ही भाडे वाढ येत्या १ सप्टेंबरपासून पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती येथे लागू होणार असून, पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्यासाठी रिक्षा चालकांना २५ रुपये आकारता येणार आहेत. तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये आकारता येणार आहे. रिक्षा चालकांकडून पूर्वी पहिल्या टप्प्यातील एक किलोमीटरसाठी २१ रुपये भाडे आकारणी केली जात होती, तर त्या पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १४ रुपये भाडे आकारले जात होते.
दरम्यान १ सप्टेंबर पासून रिक्षा चालक मीटर पुनःप्रमाणीकरण करून घेतील त्याच ऑटोरिक्षा धारकांसाठी भाडेसुधारणा लागू राहील. मीटर पुनःप्रमाणीकरणकरण्याची मुदत ३१ ऑक्टोबर पर्यंत आहे. जे ऑटोरिक्षाधारक विहित मुदतीत मीटर पुनः प्रमाणीकरण (Meter Calibration) करून घेणार नाहीत त्यांच्यावर १ ते ४० दिवसांचा परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल किंवा किमान ५० ते २ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.