प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पीएमपीएमएलकडून दोन नवे वर्तुळ बस मार्ग सुरू
By निलेश राऊत | Published: May 3, 2023 06:57 PM2023-05-03T18:57:57+5:302023-05-03T18:58:10+5:30
दोन्ही मार्गावर प्रवासी संख्येत व उत्पन्नात वाढ झाल्यास या मार्गांवर जास्तीची वर्तुळ बससेवा दिली जाणार
पुणे : पीएमपीएमएलकडून ( पुणे महानगर परिवहन महामंडळ) शहरात नव्याने दोन नवे वर्तुळ बस मार्ग सुरू करण्यात आले आहेत. ही सेवा ४ मे पासून सुरू होणार आहे. डेक्कन - शिवाजीनगर - डेक्कन व डेक्कन - पुणे विद्यापीठ - डेक्कन असे हे दाेन मार्ग राहणार आहेत.
मार्ग क्रमांक ९५ हा डेक्कन-शिवाजीनगर- डेक्कन असा राहणार असून, ही बस डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता, मनपा भवन, शिवाजी नगर, डेक्कन जिमखाना या मार्गावर धावणार आहे. तर मार्ग क्रमांक ९६ हा डेक्कन - पुणे विद्यापीठ - डेक्कन असा राहणार असून, ही बस डेक्कन जिमखाना, भांडारकर रस्ता, शेती महामंडळ, पुणे विद्यापीठ चौक, ई-स्वेअर, सिमला ऑफिस, डेक्कन जिमखाना या वर्तुळ मार्गावर धावणार आहे. मार्ग क्रमांक ९५ वर बस सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार असून, दिवसभरात १२ वेळा धावणार आहे. तर मार्ग क्रमांक ९६ वर बस सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू होणार असून, दिवसभरात सात वेळा धावणार आहे. या दोन्ही मार्गावर प्रवासी संख्येत व उत्पन्नात वाढ झाल्यास या मार्गांवर जास्तीची वर्तुळ बससेवा दिली जाणार असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाने सांगितले आहे.