महत्त्वाची बातमी! मोबाइलच्या सीमकार्डला ठेवा लाॅक नाही तर फेसबुक हाेईल हॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 01:21 PM2023-09-07T13:21:23+5:302023-09-07T13:25:02+5:30
सीमकार्ड क्लोन करून हॅकिंग...
पुणे : सध्या फेसबुक अकाउंट हॅक होण्याचे प्रमाण वाढले आहे. ओटीपी शेयर केला नाही, तरीसुद्धा फेसबुक हॅक होऊ शकते, अशी माहिती सायबरतज्ज्ञांनी दिली. मोबाइल क्लोन करून किंवा सीमकार्ड क्लोन करून फेसबुक अकाउंट हॅक केले जाऊ शकते. या प्रकाराला ‘प्रॉपर हॅकिंग’ असे संबोधले जाते; कारण अशा प्रकारचे गुन्हे पाळत ठेवून केले जातात.
मोबाइल क्लोन करून हॅकिंग
यामध्ये तुमचा संपूर्ण मोबाइल क्लोन केला जातो. त्यानंतर गुगलद्वारे ऑटोसेव्ह केलेल्या पासवर्डच्या आधारे नवीन पासवर्ड सेट केला जातो आणि तुमची प्रायव्हसी सेटिंग बदलली जाते. नवीन पासवर्ड वापरून वेगळ्या डिव्हाइसमध्ये अकाउंट लॉगिन करून पैशांची मागणी केली जाते.
सीमकार्ड क्लोन करून हॅकिंग
यामध्ये तुमचे सीमकार्ड क्लोन केले जाते. तुमच्या सीमकार्डवर येणारे कॉल्स आणि मेसेज ब्लॉक करून ते क्लोन केलेल्या डिव्हाइसमध्ये वळते केले जातात. त्यामुळे व्हेरिफिकेशसाठी आलेला फोन किंवा मेसेज क्लोन केलेल्या सीमकार्डवर येतात आणि आपल्या नकळत ओटीपी मिळतो. अशा पद्धतीने अनधिकृतपणे अकाउंटमध्ये प्रवेश करून अकाउंट हॅक केले जाते.
काय काळजी घ्यावी ?
- मोबाइलमधील अनोळखी सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल करा.
- सीमकार्डला पासवर्ड सेट करा.
- अधूनमधून फेसबुकचा पासवर्ड बदलत राहा.
- अन्य डिव्हाइसेसवर फेसबुक अकाउंट लॉगिन करू नका.
सोशल मीडिया अकाउंट हॅक करणारे हे कोणी अन्य व्यक्ती नाही तर शिक्षित हॅकर्स असतात. फेसबुक अकाउंट हॅकिंग हा प्रकार मुख्यत्वे अधिकाऱ्यांच्या बाबतीत होतात. अधिकाऱ्यांचे अकाउंट हॅक करून त्यामार्फत पैशांची मागणी करणे हा प्रकार सर्रास सुरू आहे. फेसबुक हॅक झाल्यास तातडीने प्रोफाइल लॉक करा. यावर ‘मोबाइल’ सुरक्षित ठेवणे हाच एकमात्र उपाय आहे.
आमोद वाघ, सायबर तज्ज्ञ
फेसबुकवर मेसेज करून पैशांची मागणी केल्यास देऊ नयेत. अशा वेळी नागरिकांनी संबंधित व्यक्तीशी बोलून प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी. फेसबुक हॅक झाल्यास सायबर पोलिस ठाण्यात तक्रार करावी, सायबर पोलिसांकडून ती तक्रार फेसबुककडे पाठवली जाते. त्याची फेसबुकमार्फत पडताळणी करून ते अकाउंट बंद केले जाते.
- मीनल सुपे-पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे