रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! जनरल तिकिटांची विक्री बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 09:41 AM2021-12-03T09:41:32+5:302021-12-03T09:44:35+5:30
पुणे : रेल्वे प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यात कोविड काळात रेल्वेला दिलेला स्पेशल गाड्यांचा दर्जा काढला आहे. त्यामुळे आरक्षित तिकीट पूर्वीइतकेच ...
पुणे :रेल्वे प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यात कोविड काळात रेल्वेला दिलेला स्पेशल गाड्यांचा दर्जा काढला आहे. त्यामुळे आरक्षित तिकीट पूर्वीइतकेच झाले आहे. काही मार्गांवर धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यादेखील सुरू केल्या आहेत. मात्र, हे करीत असताना जनरल तिकीट विक्री सुरू करून प्रवाशांना जनरल डब्यातूनदेखील प्रवास करण्यास परवानगी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. रेल्वेने अजूनही जनरल तिकीट विक्री बंदच ठेवली आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना जनरल डब्यांतला प्रवास आरक्षण तिकीट काढून करावा लागत आहे. त्यामुळे प्रवास महागतोय.
पुणे विभागात धावणाऱ्या काही पॅसेंजर गाड्यांपुरतेच जनरल तिकीट दिले जात आहे, तसेच लोकलसाठीदेखील आता जनरल तिकीट विक्री सुरू आहे. मात्र, लांब पल्ल्याच्या अथवा सर्वच गाड्यांसाठी जनरल तिकीट विक्री बंद आहे. याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवाशांना आरक्षित तिकीट काढूनच जनरल डब्यातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे जनरल तिकिटावर लावलेले निर्बंध काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे.
सध्या सुरू असलेल्या गाडया
पुणे- झेलम जम्मू तावी एक्स्प्रेस, पुणे- दानापूर एक्स्प्रेस, पुणे- नागपूर एक्स्प्रेस, पुणे- बिलासपूर, पुणे- हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे- हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस, पुणे- गोरखपूर, पुणे- पटना एक्स्प्रेस आदी गाड्या पुणे स्थानकावरून धावत आहेत.
बॉक्स 2
आरक्षण तिकीट असेल तरच प्रवास :
रेल्वेने स्पेशल गाडीचा दर्जा काढला असला तरीही जनरल तिकीट विक्री बंदच आहे. त्यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकीट काढूनच प्रवास करावा लागत आहे. सर्वच प्रकारच्या दर्जासाठी आरक्षित तिकीट अनिवार्य आहे. त्याशिवाय प्रवास करता येत नाही.
आरक्षित डब्यांत फुकटे वाढले
डबा जनरलचा असो की वातानुकूलित सर्वच डब्यांत आरक्षित तिकीट अनिवार्य आहे. ऐन वेळी प्रवास करणारे अनेक प्रवासी जनरल तिकीटची मागणी करून प्रवास करण्याची परवानगी मागतात. मात्र, जनरल तिकीट विक्री बंद आहे. त्यामुळे अचानक प्रवास करणारे मंडळी गाडीत शिरतात. तिकीट पर्यवेक्षकाने पकडले तर दंड भरतात. नाही तर तसेच ते प्रवास करीत राहतात. त्यामुळे फुकट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
रेल्वेने आता जनरल तिकीटावरचे निर्बंध हटविले पाहिजेत. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. पूर्वीप्रमाणे सर्वच गाडीतल्या जनरल डब्यांत जनरल तिकिटावर प्रवास करण्यास परवानगी द्यावी.
-दिनेश मोहिते, प्रवासी