जिल्हा प्रशासनाची महत्त्वाची पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 09:48 PM2018-08-14T21:48:50+5:302018-08-14T21:54:28+5:30
जिल्ह्यात सध्या विविध आंदोलने सुरू असून जिल्ह्याच्या कारभार वाढत चालला आहे. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनातील महत्त्वाची पाच महत्त्वाची पदे रिक्त आहेत.
पुणे: महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये गणना होणा-या पुणे शहरातील निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी या प्रमुख पदासह महसूल विभागाची अत्यंत्य महत्त्वाची पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत.त्यामुळे जिल्हा प्रशासनावर कामाचा ताण येत आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या पदावर तात्काळ पूर्णवेळ अधिका-यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे,अशी चर्चा अधिकारी वर्गात केली जात आहे.
जिल्ह्यात विमानतळासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबविले जात आहेत. तसेच जिल्ह्यात सध्या विविध आंदोलने सुरू असून जिल्ह्याच्या कारभार वाढत चालला आहे. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनातील महत्त्वाची पाच महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध आदेश देण्याचे अधिकार असलेले निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी हे पद सुमारे दोन महिन्यांपासून रिक्त आहे. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर चाकण येथे घडलेली घटना पाहता येथील खेड तहसिलदार हे पद, राजशिष्टाचार, जिल्हा पुर्नवसन अधिकारी आणि शहर अन्नधान्य वितरण अधिकारी यापदावर शासनाने अद्याप नव्या अधिका-यांची नियुक्ती केलेली नाही.या पदांचा पदभार प्रभारी अधिका-यांकडे देण्यात आला आहे. पुणे हा राज्यातील महत्त्वाचा जिल्हा असूनही महत्त्वाची पदे रिक्त ठेवली आहेत.मुळात जिल्ह्यात महसूल विभागाकडे कमी अधिकारी आहेत. त्यात अनेक पदे रिक्त ठेवली जात असल्याचे प्रशासनाच्या कामावर परिणाम होत आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी हे जिल्हा प्रशासनातील महत्त्वाचे पद असून जिल्हाधिकारी आणि नागरिक यांच्यातील दुवा साधण्याचे काम निवासी उपजिल्हाधिकारी हे करत असतात.त्यांना ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना आदेश देण्याचे ,जमावबंदी आदेश लागू करण्याचे अधिकार आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांची मंत्रालयात एक जून रोजी बदली झाली. तेव्हांपासून या पदावर प्रभारी अधिकारी काम करत आहेत.
तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे तहसिलदार हे पद रिक्त ठेवणे योग्य नाही.मात्र, खेड तहसिलदार हे पदही मागील दिड महिन्यांपासून रिक्त आहे.चाकण येथील घटना पाहता या ठिकाणी पूर्णवेळ तहसिलदार नियुक्त करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांना रेशनवरील धान्य वितरण करण्याची जबाबदारी असलेले शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ही पदही सुमारे वर्षभरापासून रिक्त आहे. या पदाचा तात्पुरता पदभार दुस-या अधिका-याकडे देण्यात आला आहे.
..........
पुणे जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना नेहमीच अतिमहत्त्वाच्या व्यक्ती उपस्थिती असतात. मागील सहा महिन्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे दौरे झाले आहेत. देश आणि राज्यातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा दौ-याचे नियोजन तसेच राजशिष्टाचाराचे पालन करण्याची जबाबदारी राजशिष्टाचार अधिकारी यांच्याकडे असते. या पदावर उपजिल्हाधिकारी दजार्चे अधिकारी नेमण्यात येतात. मात्र,हे पद सुध्दा गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त आहे.