पुरुषांना नपुसंकत्त्व, महिलांना मिशा...वाट्टेल त्या शंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:11 AM2021-01-21T04:11:51+5:302021-01-21T04:11:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मात्र ज्या लशीची प्रतिक्षा संपूर्ण जग अकरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. मात्र ज्या लशीची प्रतिक्षा संपूर्ण जग अकरा महिने करत होते, ती आल्यांतर मात्र ती टोचून घेण्यासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पुण्यात चित्र आहे. यामागे लसीकरणाबद्दलच्या अशास्त्रीय शंका मोठ्या प्रमाणात असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांशी बोलल्यानंतर जाणवले.
गेल्या आठवड्यातील लसीकरणाच्या पहिल्याच टप्प्यात अवघे ५५ टक्के तर दुसऱ्या टप्प्यात त्यापेक्षाही कमी म्हणजे ३१ टक्के लसीकरण झाले. विशेष म्हणजे आरोग्य क्षेत्रातल्याच डॉक्टर, परिचारिका, अन्य वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी या आरोग्य सेवकांना प्राधान्याने लस दिली जात आहे. याच लोकांमध्ये लसीबद्दलची अनास्था दिसून आली आहे.
लस ऐच्छिक असल्याचे प्रशासन सांगत असले तरी आरोग्य सेवकांच्या मनात अद्याप भीती, शंका आणि बेफिकिरी असे अनेक मुद्दे असल्याचे दिसत आहे. यासोबतच लसीकरणाच्या नोंदणी व्यवस्थेतील तांत्रिक अडचणींमुळेही काही रुग्णालयातल्या लसीकरणाला फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशात तसेच परदेशात कोरोनावरील लस विकसीत झाल्यानंतर त्याबद्दल समाजमाध्यमांमधून अनेक उलटसुलट संदेश फिरवण्यात आले. यात कोरोना लस घेतल्याने पुरुषांना नपुंसकत्व येते, महिलांना मिशा येतात अशा अत्यंत अशास्त्रीय, असत्य माहितीचाही प्रसार झाला. या माहितीला सत्याचा आधार नसला तरी त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये लसीविषयी काही प्रमाणात भीतीच निर्माण झाली. वास्तविक पहिल्या दोन टप्प्यात लस घेतलेल्या आरोग्य सेवकांमध्ये कोणत्याही समस्या आढळून आलेल्या नाहीत
चौकट
बुधवारी टक्केवारी पुन्हा घसरली
पहिल्या टप्प्यातील लसीकरणानंतर शहरात मंगळवार आणि बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिम राबविण्यात आली. मंगळवारी झालेल्या लसीकरणात ६९१ पैकी २१३ आरोग्य सेवकांनी लस घेतली. बुधवारीही लसीकरणाची टक्केवारी कमी राहिली असून ६०० पैकी अवघ्या १८४ लोकांनीच कोरोना लस घेतली. गुरुवारी सुट्टी घेऊन पुन्हा शुक्रवार आणि शनिवारी लसीकरण होणार आहे.
चौकट
बुधवारचे लसीकरण
रुग्णालय प्रत्यक्ष लसीकरण
कै. जयाबाई सुतार प्रसुतीगृह, कोथरुड ८
कमला नेहरु रुग्णालय, सोमवार पेठ (दोन केंद्र) ५२
राजीव गांधी रुग्णालय, येरवडा ५५
ससून सर्वोचपचार रुग्णालय ३०
रुबी हॉल क्लिनिक, नगर रस्ता ३९
एकूण १८४