छाप्याचा गवगवा, हाती धुपाटणे
By Admin | Published: October 22, 2015 03:00 AM2015-10-22T03:00:02+5:302015-10-22T03:00:02+5:30
साठेबाजांच्या तपासणीसाठी तूरडाळ आणि तेल व्यापाऱ्यांवर शहर अन्न धान्यपुरवठा विभागाने घातलेल्या छाप्यात ९४ घाऊक व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली.
पुणे : साठेबाजांच्या तपासणीसाठी तूरडाळ आणि तेल व्यापाऱ्यांवर शहर अन्न धान्यपुरवठा विभागाने घातलेल्या छाप्यात ९४ घाऊक व्यापाऱ्यांची तपासणी करण्यात आली. रात्रंदिवस केलेल्या या कारवाईचा गवगवाच जास्त झाला, पण त्यातून काहीही निष्पन्न न होता प्रशासनाच्या हाती केवळ धुपाटणे आले़
मार्केट यार्ड, भवानी पेठ आणि जिल्ह्यातील ९४ ठिकाणी घाऊक व्यापाऱ्यांचे साठे तपासण्यात आले. या कारवाईसाठी प्रशासनाने रात्री दुकाने बंद झाल्यानंतर ती सील केली गेली़ अचानक झालेल्या या कारवाईचा व्यापारी संघटनांनी निषेध केला़ मात्र, पुणे शहरात कोणत्याही व्यापाऱ्याकडे मर्यादेपेक्षा अधिक साठा असल्याचे आढळून आले नाही़
जिल्ह्यात भोर तालुक्यात सोयाबीनची ३२० पोती आणि टरफले असलेल्या शेंगाची ७२ पोती आढळून आली तर नसरापूरमध्ये एका दुकानात ५ हजार ८९५ लिटर तेलाचा साठा आढळून आला. भोर तहसीलदारांनी बेकायदा साठा केल्याप्रकरणी संबंधितावर कायदेशीर कारवाई सुरू केली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योेती कदम यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोठेही डाळीचा मर्यादा ओलांडून साठा आढळून आला नाही. १४५ घाऊक व्यापारी असून उर्वरित तपासणीचे काम सुरूच राहणार असल्याचे शहर अन्न धान्य पुरवठा अधिकारी नीलिमा धायगुडे यांनी सांगितले.
पुरवठा विभागाने ६ पथकांमार्फत गेली दोन दिवस डाळ आणि तेल व्यापाऱ्यांच्या तपासण्या सुरू केल्या आहेत. ५१ दुकानांच्या तपासण्या अद्याप व्हायच्या आहेत.