एका क्लिकने गुन्हेगारांवर वचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 03:49 AM2017-08-05T03:49:22+5:302017-08-05T03:49:22+5:30
आता गुगल लिंकचा वापर करून पोलीस दलातील कोणताही अधिकारी व कर्मचारी गुन्हेगारांच्या घरी धडक मारू शकणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शोधणे अधिक सोपे होणार असून
पुणे : आता गुगल लिंकचा वापर करून पोलीस दलातील कोणताही अधिकारी व कर्मचारी गुन्हेगारांच्या घरी धडक मारू शकणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांना शोधणे अधिक सोपे होणार असून, गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक अधिकच वाढेल. सध्या ही लिंक केवळ परिमंडळ ४ साठी बनवलेली असली, तरी संपूर्ण पुणे शहराच्या पोलीस ठाण्यांसाठी अशीच गुगल लिंक तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या सर्व लिंकचे काम पूर्ण झाल्यानंतर पोलिसांसाठी एक मोबाईल अॅप्लिकेशनही लवकरच बनविण्यात येईल, अशी माहिती पुणे दक्षिण विभागाचे अपर आयुक्त शशिकांत शिंदे यांनी दिली.
शशिकांत शिंदे यांच्या हस्ते हिस्टरीशिटर्श, अर्थात रेकॉर्डवरील गुन्हेगारांची गुगल लिंक पोलीस १९ ठाण्यांना प्रदान करण्यात आली. यामध्ये पुणे शहर व उत्तर प्रादेशिक पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कदम व तांत्रिक तज्ज्ञ रियाज नदाफ यांनी ही लिंक तयार केली आहे.