रिपाइंसमोर निवडणूक चिन्हाचा पेच
By admin | Published: January 10, 2017 03:54 AM2017-01-10T03:54:10+5:302017-01-10T03:54:10+5:30
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने (आठवले गट) आगामी महापालिका निवडणुका भारतीय जनता पक्षासोबत युती करून
पुणे : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने (आठवले गट) आगामी महापालिका निवडणुका भारतीय जनता पक्षासोबत युती करून लढविल्या जाणार आहेत. या निवडणुकीला सामोरे जाताना स्वतंत्रपणे पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवायच्या की भाजपाचे कमळ हाती घ्यायचे, असा पेच सध्या रिपाइंसमोर निर्माण झाला आहे.
रिपाइं स्वतंत्र चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्यांना भाजपाच्या परंपरागत मतांचा आणि मोदी लाटेचा लाभ उठविता येणार नाही किंवा भाजपाचे कमळ चिन्ह घेऊन रिपाइंचे उमेदवार मतदारांसमोर गेल्यास त्यांचा मतदार कमळ या चिन्हावर मतदान करणार का, असा दुहेरी पेच रिपाइंसमोर निर्माण झाला आहे. हा तिढा लवकरात लवकर त्यांना सोडवावा
लागेल, कारण सर्व मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचविण्यासाठी त्यांच्या हातात खूपच कमी वेळ राहिलेला आहे.
भाजपा आणि रिपाइंच्या वैचारिकतेमध्ये मोठा फरक आहे. रामदास आठवले भाजपामध्ये गेल्यापासून त्यांना या प्रश्नांना सातत्याने तोंड द्यावे लागत आहे. दलित चळवळीतील कार्यकर्त्यांना या युतीची वास्तविकता पटवून देण्याची मोठी जबाबदारी रिपाइंच्या स्थानिक नेत्यांना पार पाडावी लागेल.
महापालिकेच्या सभागृहातील सदस्यांची संख्या मोजकीच असली तरी रिपाइंने मागासवर्गीय तसेच गोरगरिबांच्या प्रश्नांना सभागृहात वेळोवेळी वाचा फोडली आहे. महापालिकेच्या निवडणुका १९९७मध्ये त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने लढविल्या गेल्या होत्या, त्या वेळी रिपाइंचे ७ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर २००२, २००७, २०१२ या तिन्ही निवडणुकांत रिपाइंच्या नगरसेवकांचा आकडा २ पर्यंतच मर्यादित राहिला होता. आगामी २०१७च्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका लढविल्या जात आहेत. चार सदस्यीय प्रभाग पद्धतीचा छोट्या पक्षांना मोठा फटका बसेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, भाजपासोबत युती करून रिपाइं या निवडणुकीला सामोरी जात असल्याने त्याची झळ त्यांना कमी बसण्याची शक्यता आहे.
रिपाइंच्या दोन नगरसेवकांपैकी एक नगरसेविका सुनंदा देवकर यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश केला आहे. रिपाइंकडून भाजपाकडे २८ जागांची मागणी करण्यात आली आहे; मात्र भाजपाकडून त्याच्या निम्म्यापेक्षाही कमी जागा रिपाइंला सोडल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिपाइंला मिळालेल्या मर्यादित जागांवर पक्षाची
संपूर्ण ताकद लावून तिथून विजय मिळवावा लागणार आहे.