रेल्वे रूळावर जनावरे सोडणाऱ्यांना कारावास : कृष्णाथ पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 07:54 PM2018-04-24T19:54:36+5:302018-04-24T19:54:36+5:30
जनावरे रेल्वे रूळाकडे सोडणाऱ्या मालकांना पाच वर्षांचा कारावास आणि दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे पुणे वरिष्ठ मंडलचे वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी दिला आहे.
पुणे : रेल्वेच्या हद्दीत कचरा टाकणे हा कायद्याने गुन्हा आहे. कोणी टाकताना आढळल्यास संबंधितावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वारंवार जनावरे रेल्वे रूळावर येतात. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. जनावरे रेल्वे रूळाकडे सोडणाऱ्या मालकांना पाच वर्षांचा कारावास आणि दंड आकारण्यात येणार असल्याचा इशारा रेल्वे पुणे वरिष्ठ मंडलचे वाणिज्य प्रबंधक कृष्णाथ पाटील यांनी दिला आहे.
कृष्णाथ पाटील म्हणाले, जनावरे रेल्वे रूळावर येण्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांत वारंवार अशा घटना घडल्या आहेत. रेल्वे अधिनियम १४७, १५३ आणि १७४ प्रमाणे गुन्हा आहे. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नागरिकांनी बेकायदेशीर रेल्वे रूळ ओलांडू नये. रेल्वे फूटब्रीजचा वापर करावा. तसेच रेल्वेच्या हद्दीत कचरा टाकल्यास ५०० रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
याबाबत रेल्वे पुणे मंडलच्या वतीने पुणे स्टेशन, शिवाजीनगरसह लोणावळा, दौंड पिंपरी, निगडी, हडपसर, केडगाव स्टेशन परिसरात जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यत ५ हजार पत्रके वाटून नागरिकांमध्ये जागृतीचे काम रेल्वे कर्मचाऱ्यांनी केले. त्यामुळे नागरिकांनी यापुढे काळजी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.