महापालिका निवडणुका पुढे ढकलणे अयोग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:15 AM2021-09-08T04:15:35+5:302021-09-08T04:15:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “निवडणूक आयोगाने कोरोना साथीचे सर्व नियम पाळून निवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे. महापालिका निवडणूक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “निवडणूक आयोगाने कोरोना साथीचे सर्व नियम पाळून निवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे. महापालिका निवडणूक फेब्रुवारी-२०२२ मध्ये होणार आहे. राज्यातल्या सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे. आता निवडणूक एक-दोन वर्षे पुढे ढकलणे योग्य वाटत नाही,” असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
मंगळवारी (दि. ८) पुण्यात एका कार्यक्रमात पवार बोलत होते. इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारकडून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलली जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा दबाव निर्माण केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी भूमिका स्पष्ट केली.
कोरोनाकाळात सर्व व्यवहार आणि दुकाने सुरू झाली आहेत. पण आता राजकीय पक्षांकडूनही मंदिरे उघडण्याबाबतही आंदोलने होत आहेत. शाळा उघडण्याबाबही विचार सुरू आहे. पण काहीही उघडायचे असल्यास सरकारची आणि आरोग्य विभागाची परवानगी घ्यावी लागते. ज्या ठिकाणी नागरिक नियमांची काळजी घेतील तिथेच परवानगी दिली जाईल, असे पवार म्हणाले. रिझर्व्ह बँकेचे नागरी सहकारी बँकांबाबतचे धोरण पाहता देशातून नागरी सहकारी बँका बंद करण्याचा रिझर्व्ह बँकेचा इरादा दिसतो. विशिष्ट लोकांच्या हाती सूत्रे देऊन सहकारक्षेत्र संपविण्याचा घाट केंद्राकडून सुरू असल्याची टीका पवारांनी केली.
चौकट
ईडीवर संसदेत करणार चर्चा
“ज्या ठिकाणी गैरव्यवहार झाला असेल त्याचा तपास करण्यासाठी वेगवेगळे आयोग, राज्याचे गृहखाते आहे. तरीही ईडीने त्या संस्थांमध्ये जाऊन हस्तक्षेप करणे योग्य वाटत नाही. ही ईडी कोणाच्या मागे कशी लागेल हे सांगता येत नाही. ईडीच्या कारवायांमुळे राज्याच्या अधिकारांवर अतिक्रमण होत आहे. त्यामुळे संसदेत या मुद्यावर चर्चा करणार आहे,” पवार यांनी स्पष्ट केले.
चौकट
मोहन भागवतांना टोला
“आपली मातृभूमी आणि गौरवशाली परंपरा हा देशातील एकतेचा आधार आहे. भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत. हिंदू धर्माची ही व्याख्या ज्या कुठल्या पंथातील, धर्मातील, भाषेतील नागरिक मानतात, त्या सगळ्यांना आम्ही हिंदू मानतो,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वेसर्वा मोहन भागवत यांनी केले होते. त्यावर पवार म्हणाले, “मोहन भागवत हे सर्व धर्मांना एकच समजतात ही माझ्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदू-मुस्लिम त्यांना एक वाटतात हेच आमच्यासाठी खूप आहे. त्यामुळे माझ्या ज्ञानातही भर पडली.”