गुणांत तफावत असल्यास सुधारणा करा
By admin | Published: March 20, 2017 04:32 AM2017-03-20T04:32:33+5:302017-03-20T04:32:33+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व व मुख्य परीक्षेनंतर आयोगाकडून वेगवेगळ्या पॅनलमार्फत घेतल्या
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व व मुख्य परीक्षेनंतर आयोगाकडून वेगवेगळ्या पॅनलमार्फत घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीमध्ये उमेदवारांना देण्यात येणाऱ्या गुणांत मोठी तफावत दिसते. या प्रक्रियेमध्ये सुधारणा व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी असल्यास आयोगाने त्याचा विचार करायला हवा, असे मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी रविवारी व्यक्त केले.
‘द युनिक अॅकॅडमी’तर्फे आयोजित राज्य सेवा परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ठाकरे बोलत होते.याप्रसंगी युनिक अॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, सनदी अधिकारी नरेंद्र कुलकर्णी, मनोहर भोळे, नागेश गव्हाणे यांच्यासह अॅकॅडमीचे पदाधिकारी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारीपासून ते कक्षाधिकारी पद मिळालेल्या गुणवंतांचा कौतुक सोहळा पाहण्यासाठी गणेश कला क्रीडा मंच येथे मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमात ‘महाराष्ट्र वार्षिकी २0१७’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. राज्यात प्रथम आलेल्या भूषण अहिरे, पूनम पाटील यांच्यासह इतर यशस्वी उमेदवारांनी मनोगत व्यक्त केले.
ठाकरे म्हणाले, एमपीएससी परीक्षेत कोणत्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले, हे कुणालाच माहिती नसते. यूपीएससी व सेना दलात तुम्हाला किती गुण मिळाले, त्यापेक्षा मुलाखतीला तुम्ही कशा प्रकारे सामोरे गेलात, त्यावरून गुण निश्चित केले जातात. त्याचप्रमाणे एमपीएससीमध्ये पद्धत आहे. परंतु, तहसीलदार म्हणून निवड झालेल्या श्रीकांत निळे या विद्यार्थ्याने आपल्या मनोगतात मुलाखतीत पॅनेलकडून दिल्या जाणाऱ्या गुणपद्धतीवर शंका उपस्थित केली. मुलाखतीत एका पॅनलकडून ३0, २७ गुण दिले जातात, तर अन्य एका पॅनलकडून ६0 अथवा ७0 गुण दिले जातात. यात सुधारणा झाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुलाखतीच्या प्रक्रियेत सुधारणा व्हावी, अशी उमेदवारांची मागणी असल्यास त्याचा विचार झाला पाहिजे.
एमपीएससीमध्ये पास व नापास ही संकल्पना नाही, असे नमूद करून ठाकरे म्हणाले, की गेल्या काही वर्षांत एमपीएससीमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. एमपीएससीच्या यंत्रणेत सर्वत्र पारदर्शकता आणली आहे. एमपीएसीच्या पारदर्शी यंत्रणेमुळे प्रतिकूल परिस्थितीत असणारे विद्यार्थी अधिकारी होत आहेत. त्याचप्रमाणे महिलाही अधिकारी होण्यात आघाडीवर आहेत.
मनोहर भोळे म्हणाले, कठोर परिश्रम व अडचणीवर मात करून स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच प्रवेशाचे द्वार खुले होते. राज्यात पहिला आलेला भूषण अहिरे याचा उदाहरण देत त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व पटवून दिले. राज्य सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या एकूण १३0 उमेदवारांमध्ये युनिक अॅकॅडमीच्या ८२ विद्यार्थ्यांची अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
तुकाराम जाधव म्हणाले, स्पर्धा परीक्षांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश मिळू शकते, हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न अॅकॅडमीतर्फे केला जातो. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांचा कौतुक सोहळा व तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकते.
(प्रतिनिधी)