गुणांत तफावत असल्यास सुधारणा करा
By admin | Published: March 21, 2017 05:11 AM2017-03-21T05:11:43+5:302017-03-21T05:11:43+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व व मुख्य परीक्षेनंतर आयोगाकडून वेगवेगळ्या पॅनलमार्फत घेतल्या
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्व व मुख्य परीक्षेनंतर आयोगाकडून वेगवेगळ्या पॅनलमार्फत घेतल्या जाणाऱ्या मुलाखतीमध्ये उमेदवारांना देण्यात येणाऱ्या गुणांत मोठी तफावत दिसते. या प्रक्रियेमध्ये सुधारणा व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी असल्यास आयोगाने त्याचा विचार करायला हवा, असे मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी व्यक्त केले.
‘द युनिक अॅकॅडमी’तर्फे आयोजित राज्य सेवा परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात ठाकरे बोलत होते.याप्रसंगी युनिक अॅकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव, नरेंद्र कुलकर्णी, मनोहर भोळे, नागेश गव्हाणे उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, एमपीएससी परीक्षेत कोणत्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले, हे कुणालाच माहिती नसते. यूपीएससी व सेना दलात तुम्हाला किती गुण मिळाले, त्यापेक्षा मुलाखतीला तुम्ही कशा प्रकारे सामोरे गेलात, त्यावरून गुण निश्चित केले जातात. त्याचप्रमाणे एमपीएससीमध्ये पद्धत आहे. परंतु, तहसीलदार म्हणून निवड झालेल्या श्रीकांत निळेने मुलाखतीत पॅनेलकडून दिल्या जाणाऱ्या गुणपद्धतीवर शंका उपस्थित केली. तुकाराम जाधव म्हणाले, स्पर्धा परीक्षांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश मिळू शकते, हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न अॅकॅडमीतर्फे केला जातो. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांचा कौतुक सोहळा व तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरू शकते. (प्रतिनिधी)