कुकडी प्रकल्पाच्या ३९७७ कोटींच्या खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 02:55 AM2018-09-19T02:55:00+5:302018-09-19T02:55:20+5:30
पुणे, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांना होणार फायदा
मुंबई : कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या ३९७७ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. या निर्णयाचा फायदा अहमदनगर, पुणे व सोलापूर जिल्ह्याला होईल.
कुकडी प्रकल्पाच्या डाव्या कालवा क्षेत्रातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. चौंडी, दिघी, जवळा बंधारा, तुकाई व बिटकेवाडी या योजनांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा ६४.४८ दशलक्ष घनमीटर इतका आहे. वरील सात तालुक्यातील एकूण १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर क्षेत्रास ७१८ किमी लांबीच्या विविध कालव्याद्वारे सिंचनाच लाभ मिळणार आहे. जलसंपदा विभागाकडून ३ हजार ९४८ कोटी रुपये तर उर्वरित रक्कम आदिवासी विकास विभागाकडून मिळेल. जलसंवर्धन मंत्री राम शिंदे यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. आ. नारायण आबा पाटील, राजेंद्र देशमुख, अधीक्षक अभियंता धुमाळ आदी उपस्थित होते.
आंबेगाव, जुन्नर, शिरूरला फायदा
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, शिरूर, अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, पारनेर, श्रीगोंदा, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हते. आजच्या निर्णयामुळे कालव्याद्वारे या तालुक्यांपर्यंत पाणी पोहोचणार आहे. येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे व पिंपळगाव या पाच धरणांचा समावेश कुकडी प्रकल्पामध्ये आहे.