टपाल कार्यालयाचा कारभार सुधारा, चाकणच्या नागरिकांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 08:04 PM2018-01-01T20:04:08+5:302018-01-01T20:04:08+5:30
मोबाईल, फॅक्स, इंटरनेट, कुरिअर आणि संवादाच्या इतर आधुनिक माध्यमांमुळे अडगळीत पडलेल्या पोस्ट कार्यालयांना समस्यांचा विळखा पडलेला असतानाच , सुविधांचा आभाव
हनुमंत देवकर
चाकण : मोबाईल, फॅक्स, इंटरनेट, कुरिअर आणि संवादाच्या इतर आधुनिक माध्यमांमुळे अडगळीत पडलेल्या पोस्ट कार्यालयांना समस्यांचा विळखा पडलेला असतानाच , सुविधांचा आभाव , कर्मचाऱ्यांचा उर्मटपणा ,अधिकाऱ्यांची अनास्था, यामुळे चाकण च्या टपाल कार्यालयाचा कारभार रामभरोसे झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या कार्यालयात कुठलेही तातडीचे काम लवकर होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असून पुरेशे मनुष्यबळ भरून पोष्टाचा कारभार सुधारण्याची मागणी चाकण परिसरातील नागरिकांकडून होत आहे .
औद्योगिक वसाहत, छोटे, मोठे व्यावसायिक तसेच लगतच्या वाड्या वस्त्या व गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण म्हणून चाकण येथून या टपाल कार्यालयाचा कारभार चालतो. विविध शासकीय कामांसह, या भागातील सर्व बँका ,पतसंस्था यांचा कारभार तसेच दैनंदिन टपाल, ठेव योजना, बचत योजना, विमा योजना या सर्व कामांचा भार येथील टपाल कार्यालयावर आहे. नागरिकांना ताटकळत खिडकीसमोर रांगेत उभे राहावे लागते. कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्यामुळे कामास विलंब होतो अशी खुद्द या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्यांची खंत आहे. शहराची व लगतच्या भागातील लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. गेल्या दहा पंधरा वर्षांत शहर झपाट्याने विस्तारले आहे; मात्र पोस्टमनची पदे जुन्याच मानकाप्रमाणे मंजूर आहेत. चाकण व लगतच्या गावांमधील सुमारे अडीच लाख लोकवस्तीसाठी तीन अधिकारी व हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आठ-दहा कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचारी कमी असल्यामुळे नागरिकांना पत्र वेळेवर मिळत नाहीत. मोबाइलमुळे पोस्टाचा पत्रव्यवहार कमी झाला असला, तरी शासकीय पत्रे, कंपन्यांची टपाल , फोन, मोबाईलची बिले, विमा संबंधित पत्रांची संख्या मोठी आहे. या पत्रांच्या वितरणासाठी अपुरे पोस्टमन आहेत. त्यामुळे वितरणाच्या कामाचाही खोळंबा होत असल्याच्या तक्रारी आहेत.