येरवड्यातील टपऱ्यांचे अतिक्रमण काढले : ईशान्य मॉलजवळ कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 04:58 PM2019-06-25T16:58:31+5:302019-06-25T17:24:05+5:30
येरवडा येथील ईशान्य मॉलजवळील जलसंपदा विभागाच्या वसाहतीच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे टप-या उभ्या करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण अखेर काढण्यात आले आहे.
पुणे: येरवडा येथील ईशान्य मॉलजवळील जलसंपदा विभागाच्या वसाहतीच्या मोकळ्या जागेत बेकायदेशीरपणे टप-या उभ्या करून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण अखेर काढण्यात आले आहे. संबंधित टपऱ्यांवर कारवाई करण्यास जलसंपदा विभागाकडून चालढकल केली जात असल्याचे दिसून आले होते. मात्र अखेर लोकमतच्या पाठपुराव्यानंतर हे अतिक्रमण काढण्यात आले.
येरवडा येथील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड परिसरालगत जलसंपदा विभागाची वसाहती असून या वसाहतीमध्ये काही कुटुुंब वास्तव्यास आहेत. या वसाहतीच्या मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे टप-या उभारण्यात आल्या होत्या. काही टप-या अनेक वर्षांपासून होत्या. मात्र,जलसंपदा विभागाकडून या टप-यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने टप-यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली होती. जलसंपदा विभागाकडून मे महिन्याच्या दुस-या आठवड्यात कारवाई केली जाणार होती. मात्र, काही राजकीय पक्षातील नेत्यांनी हस्तक्षेप केल्याने टप-यांवर कारवाई झाली नाही.त्यामुळे या परिसरात नवीन टप-या आणून ठेवण्यात आल्या होत्या .जलसंपदा विभागाच्या जागेत केवळ लहान व्यावसायिकांच्या टप-याच नाही तर अनधिकृतपणे किराना मालाचे दुकान,हॉटेल्स,आयस्क्रिम पार्लर आदी सुरू करण्यात आले होते. अखेर त्यांच्यावर आता कारवाई करत हे अतिक्रमण हटवण्यात आले आहे.