TET Exam Scam: टीईटीच्या अपात्र १७७८ परीक्षार्थींना पैसे घेऊन केले पात्र; धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 20:49 IST2022-02-24T20:44:46+5:302022-02-24T20:49:03+5:30
टीईटी परीक्षेच्या २०१८ व २०१९ -२० अशा दोन्ही परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याने त्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

TET Exam Scam: टीईटीच्या अपात्र १७७८ परीक्षार्थींना पैसे घेऊन केले पात्र; धक्कादायक माहिती समोर
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) २०१८ मध्ये अपात्र १ हजार ७७८ परीक्षार्थीकडून पैसे घेऊन त्यांना पात्र केले असल्याचे आढळून आले आहे. टीईटी परीक्षेच्या २०१८ व २०१९ -२० अशा दोन्ही परीक्षांमध्ये गैरव्यवहार झाल्याने त्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०१८ च्या गुन्ह्यात आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली असून आणखीन १२ आरोपी निष्पन्न झाले आहेत.
सायबर पोलिसांनी २०१८ मधील परीक्षार्थींचे ओएमआर शीटची तपासणी केली. त्यात १२ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रदर्शित झालेल्या निकालात एकूण ८१७ परीक्षार्थींचे गुण वाढविण्यात आल्याचे उघड झाले आहे. हा निकाल ऑनलाईन प्रदर्शित झाल्यानंतर या निकालामध्ये अपात्र असलेले आणखीन ७१० व ३८ परीक्षार्थीचे गुण वाढवून त्यांची माहिती नंतर दोन वेळा वेबसाईटवर प्रदर्शित करण्यात आली आहे. अशा प्रकारे २०१८ च्या परीक्षेत १ हजार ७७८ अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे आढळून आले आहे. त्यातील २१३ व ७४८ परीक्षार्थींचे यादीत काही परीक्षार्थी कॉमन आहे. त्यामुळे पडताळणीअंती १ हजार ७७८ या संख्येत घट होण्याची शक्यता आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजय पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.