लखलख दिव्यांच्या रथात, दगडूशेठ निघाले थाटात; विसर्जन मिरवणुकीत गणाधीश रथावर सहभागी
By श्रीकिशन काळे | Published: September 28, 2023 05:17 PM2023-09-28T17:17:22+5:302023-09-28T17:19:33+5:30
मिरवणुकीवर जलाभिषेक होत असून, गणपती बाप्पाचा गजर, ढोलताशांचा ताल यामुळे मिरवणुकीत आणखीनच रंगत येत असल्याचे पहायला मिळत आहे...
पुणे : यंदा गणेशोत्सवात पहिल्यांदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बेलबाग चौकात सायंकाळी साडेचार वाजता आला आहे. त्यामुळे तो आता लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला असून, गणाधीश थरांमध्ये लक्षलक्ष दिव्यांनी गणरायाचे रूप आणखीनच उजळून निघाले आहे. त्याचे हे रूप टिपण्यासाठी भाविकांनी मोबाईल, कॅमेरे सरसावले आहेत. मिरवणूक लवकर संपविण्याचा निर्धार मंडळांनी केला आणि त्याला दगडूशेठ गणपतीने साथ दिली आहे. मिरवणुकीवर जलाभिषेक होत असून, गणपती बाप्पाचा गजर, ढोलताशांचा ताल यामुळे मिरवणुकीत आणखीनच रंगत येत असल्याचे पहायला मिळत आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३१ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अतिशय थाटात निघाली आहे. यंदा श्री गणाधीश रथामध्ये दगडूशेठ चे गणपती बाप्पा विराजमान आहेत. आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघाला आहे. विसर्जन मिरवणुकीसाठीचा श्री गणाधीश रथ हा भगवान श्रीगणेश आणि यंदाची सजावट असलेल्या अयोध्या श्रीराम मंदिर संकल्पनेला सुसंगत असा आहे.
श्री गणाधीश रथावर ८ खांब साकारण्यात आले आहेत. प्रत्येक खांबांवर हत्तीची मूर्ती साकारण्यात आली असून, ते गजस्तंभ दिव्यांच्या प्रकाशात न्हाहून निघाला आहे. भगवान शंकरांच्या ८ गणांच्या मूर्ती रथावर आहेत. त्यासोबतच मागील बाजूस दोन हनुमानाच्या मूर्ती आहेत. रथाचा आकार १५ बाय १५ फूट असून उंची २१ फूट इतकी आहे. रथावर १ मुख्य कळस बसविला आहे. तसेच त्याच्या भोवती इतर असे मिळून पाच कळस आहेत. आकर्षक रंगांमध्ये विविध लाईटस् रथावर वापरण्यात आल्या आहेत.
दगडूशेठने मिरवणूक लवकर संपविण्यासाठी केला श्रीगणेशा#punepic.twitter.com/kl7iv6wcde
— Lokmat (@lokmat) September 28, 2023
मिरवणुकीत आरोग्य रथ अग्रभागी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा सामाजिक विषयांतर्गत आरोग्यविषयक जनजागृती रथावरुन केली जात आहे.तसेच मिरवणुकीत प्रभात ब्रास बँड, दरबार ब्रास बँड, स्वरूप वर्धिनीचे ढोल-लेझिम पथक, सनई-चौघडा असा लवाजमा पहायला मिळत आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीचा हा थाट पाहण्यासाठी पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त मोठया संख्येने उपस्थित आहेत.लहान मुले देखील असून, अनेक भाविकांनी छत्र्या आणलेल्या आहेत. कारण पावसाचा जलाभिषेक मिरवणुकीवर होत आहे.
दगडूशेठ गणपती मंडळमागे अनेक मंडळे असतात मिरवणूक लवकर संपावी हा हेतू आहे. यात कुणालाही डावळण्याचा प्रश्न नाही. आमची मिरवणूक ९ पर्यंत संपेल. संपूर्ण मिरवणूक यंदा किमान ५ ते ६ तास लवकर संपेल.
- महेश सूर्यवंशी अध्यक्ष दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ