Pune: नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात, चिमुकल्यांसह संपूर्ण कुटुंबावर काळाचा घाला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 11:32 AM2023-12-18T11:32:05+5:302023-12-18T11:33:07+5:30
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथून मेव्हणीच्या लग्नावरून रात्री उशिरा घरी परतत असताना त्या कुटुंबावर काळाने घाला घातला...
उदापूर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील कल्याण महामार्गावर अंगावर शहारे आणणारा अपघात झाला. त्यात संपूर्ण कुटुंबाला जीव गमावावा लागला. दोन चिमुकल्यांचाही या अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथे रविवारी रात्री १०:३० च्या सुमारास तिहेरी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात माळशेज घाटाशेजारी असणारे मढ या गावात राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा अपघातात मृत्यू झाला आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथून मेव्हणीच्या लग्नावरून रात्री उशिरा घरी परतत असताना त्या कुटुंबावर काळाने घाला घातला.
या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गणेश उर्फ ओमकार मस्करे (वय. ३० वर्ष) , कोमल मस्करे (वय. २५ वर्ष), हर्षद मस्करे (वय ४ वर्ष), काव्या मस्करे (वय ६ वर्ष) सर्व रा. मढ तालुका जुन्नर येथील स्थानिक रहिवासी आहे. तसेच त्यांच्याकडे कामाला असणारा अमोल मुकुंदा ठोके, रा.जालना व रिक्षामधील नरेश नामदेव दिवटे (वय ६६) आणि इतर दोन अज्ञात इसमांचा (ओळख पटली नाही) समावेश आहे.
गणेश मस्करे हे कुटुंबासोबत मेव्हणीच्या लग्नासाठी जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी या गावी गेले होते. लग्न आटोपून ते रात्री उशिरा आपल्या घरी परतत होते. ते भाजीपाला व्यावसायिक असल्याने त्यांनी पिकअप गाडी भरली होती. आपल्या कुटुंबाला घरी सोडून ते नेहमीप्रमाणे टोकावडे या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी जाणार होते. मात्र नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. ते आपल्या घरी पोहचण्या अगोदरच पिंपळगाव जोगा व डिंगोरे हद्दीतील सीमेवर अंजिराची बाग या ठिकाणी त्यांचा गाडीला भीषण आपघात झाला आहे.