Railway Passenger: फुकट्यांची संख्या वाढली; वर्षभरात तब्बल पावणे चार लाख जणांना रेल्वेचा दणका, कोटींनी महसूल जमा
By अजित घस्ते | Published: June 17, 2024 04:28 PM2024-06-17T16:28:19+5:302024-06-17T16:28:37+5:30
पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर वर्षभरात ३ लाख ७० हजार ८२४ इतके प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले
पुणे : पुणे विभागाकडून वर्षभरात राबविलेल्या विशेष तिकिट तपासणी मोहिमेत पुणे विभागातील सर्व स्थानकातील तब्बल ३ लाख ७० हजार ८२४ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करुन २७ कोटी ८३ लाख ५ हजार ३५ रुपये इतके दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२४ मध्ये पुणे विभागाला सव्वातीन कोटी रुपये जादा महसूल मिळाला आहे.
पुणे रेल्वे विभागातील पुणे, सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर व गाडीमध्ये फुकट प्रवास करणार्यांना तिकीट तपासणीदरम्यान वर्षभरात ३ लाख ७० हजार ८२४ इतके प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून २७ कोटी ८३ लाख ५ हजार ३५ रुपये इतके दंड वसूल करण्यात आला. यामध्ये आरक्षित स्लीपर बोगीतून बेकायदेशीरपणे प्रवास करणार्यांकडून तब्बल ५ कोटी ९९ लाख ८१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तर प्रवासादरम्यान क्षमतेहून अधिक साहित्य घेऊन जाणार्या प्रवाशांकडून २ लाख ४९ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.