Ashadhi Ekadashi: आळंदीत माऊली नामाचा गजर, संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 06:03 PM2024-07-17T18:03:37+5:302024-07-17T18:03:48+5:30
एकादशी निमित्त शहरातील विविध मंदिरे, मठ आणि धर्मशाळांमध्ये कीर्तन, प्रवचन आणि भजने असे धार्मिक कार्यक्रम पार पडले
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत देवशयनी आषाढी एकादशी निमित्त हजारो भाविकांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. दरम्यान बुधवारी (दि.१७) अलंकापुरी टाळ - मृदंगाच्या गजराने आणि माऊली नामाच्या जयघोषाने दुमदुमून निघाली. तत्पूर्वी, आषाढी एकादशी निमित्ताने पहाटे घंटानाद, पवमान अभिषेक व दुधारती झाली. त्यानंतर भाविकांना दर्शनबारीतून माऊलींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला. यावेळी वारकऱ्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे. दर्शनबारीतून भाविकांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे मनोभावे दर्शन घेतले.
दरम्यान पंढरीत लाखों वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी साजरी होत आहे. मात्र ज्या भाविकांना पंढरपूरला जाणे शक्य झाले नाही; अशा असंख्य भाविकांनी आळंदीत माऊलींचरणी आपली वारी समर्पित केली. एकादशी निमित्त शहरातील विविध मंदिरे, मठ आणि धर्मशाळांमध्ये कीर्तन, प्रवचन आणि भजने असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. आळंदीत दिवसभर हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. तरीही भाविकांनी मोठ्या श्रद्धेने पवित्र इंद्रायणीचे दर्शन घेत माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले.
अनेक भाविक माऊलींचे मुखदर्शन, स्पर्श दर्शन आणि मंदिर कळस दर्शन घेऊन धन्यता मानत होते. इंद्रायणी घाटावरही भाविकांची गर्दी झाली होती. दिवसभरात सुमारे वीस हजारांहून अधिक भाविकांनी माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.