Ashadhi Wari: आम्हा ध्यास पंढरीचा अपार.. अवघड वाटही होते लीलया पार..! माऊली सासवडला मुक्कामी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 08:56 PM2024-07-02T20:56:08+5:302024-07-02T20:58:11+5:30
Ashadhi Wari दिवे घाटातील वारीच्या वाटेवरील सर्वात कठीण नागमोडी वळणाचा टप्पा पार करत माऊली संध्याकाळी सासवड मुक्कामी दाखल झाले
सासवड/गराडे: आम्हा ध्यास पंढरीचा अपार.. अवघड वाटही होते लीलया पार..! विठ्ठलाच्या नामाचा अखंड जयघोष करीत व भक्तीचे भारावलेपण घेऊन पंढरीच्या वाटेवर असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने लाखो वैष्णवांचा साथीने ज्येष्ठ कृष्ण योगिनी एकादशी मंगळवारी दिवे घाटातील वारीच्या वाटेवरील सर्वात कठीण नागमोडी वळणाचा टप्पा पार केला. सुमारे दोन तास घाटातील वाटचाल पूर्ण करून सोहळा संध्याकाळी सासवड मुक्कामी दाखल झाला.
डोक्यावर तुळशी वृंदावन, खांद्यावर भगव्या पताका, गळ्यात टाळ, मृदुंग, मुखाने ज्ञानोबा तुकाराम च्या नावाचा जयघोष करीत घाट पार करीत होते. त्यात वरुणराजाने चांगलीच भर घातली. सायंकाळी साडेचार वाजता संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे वैष्णवासमवेत दिवेघाटातून पुरंदर तालुक्यात आगमन झाले. माऊलींच्या दर्शनासाठी आसुसलेल्या लाखो भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाट आणि पुष्पवृष्टी करीत आनंद व्यक्त करीत मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
दिवे घाटातील वारीच्या वाटेवरील सर्वात कठीण नागमोडी वळणाचा टप्पा पार करून माऊली सासवडला मुक्कामी #pune#ashadhiwari#saswad#pandharpurpic.twitter.com/D7L7F8Bt7v
— Lokmat (@lokmat) July 2, 2024
माउलींचा पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी २ वा. वडकीनाला येथे विसाव्यासाठी थांबला. यावेळी वडकी ग्रामपंचायत व अनेक सार्वजनिक मंडळांनी अन्नदान केले. त्यानंतर दुपारी ३.३० वा. सर्वात अवघड टप्पा समजल्या जाणाऱ्या दिवेघाटातील वाटेने माऊलींच्या रथाचा प्रवास सुरू झाला. रथाला पाच बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या. वातावरण ढगाळ स्वरूपाचे,जोरदार वाहता वारा व हवेत काहीसा थंडावा असल्याने उन्हाचा त्रास झाला नाही. मोठय़ा अंतराचा हा टप्पा चढताना न थकता दिंडीतील वारकरी निरनिराळी पदे, अभंग, भारुडे,गौळणी म्हणताना दिसत होते. वारकऱ्यांमध्ये एक वेगळेच चैतन्य संचारले होते. संत ज्ञानेश्वर पालखी तळावर पादुकांचे आगमन झाल्यावर सामुहिक आरती होवून दोन दिवसांच्या मुक्कामासाठी माऊलींचा सोहळा विसावला.
पालखी सोहळ्यापुर्वीच पाऊस झाल्याने बळीराजा समाधानी
दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुरंदरला आला कि, पाऊस येतो अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्यामुळे सोहळ्याच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. मात्र अनेक वर्षे हि परंपरा खंडित झाली होती. पालखी सोहळा येवून अनेक वेळा कोरडाच गेल्याने यंदा काय होते ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मात्र यंदा वेळेवर पाऊस झाला तसेच माउलीचे आज आगमन होत असतानाच सकाळी वरुणराजाने हजेरी लावली. आणि दिवसभर थोड्या फार प्रमाणात उपस्थिती दाखविल्याने पुरंदरचा शेतकरी यंदा समाधानी असल्याचे पाहायला मिळाले.